नवापूर: शहरातील काही भागात जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी भेट देऊन पावसाळ्यापूर्वी नालेसफाई करण्याच्या सुचना मुख्याधिकाऱ्यांना दिल्या. शहरात स्वच्छतेची कामे त्वरित सुरू करण्यात यावीत, असे त्यांनी सांगितले. गावातील दुकाने नव्या निर्देशानुसार सुरू करताना गर्दी होणार नाही आणि कोरोनाविषयक नियमांचे पालन होईल याची दक्षता घ्यावी, असेही आवाहन त्यांनी केले.
सरपणी नदीतील गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ
जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांच्या हस्ते नवापूर तालुक्यातील वराडीपाडा येथे सरपणी नदीतील गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. त्यांनी लहान कडवान आणि गंगापूर येथील कामालाही भेट देवून कामांची माहिती घेतली आणि मजूरांशी संवाद साधला.
जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी गुजरात सीमेवरील आरटीओ चेकपोस्टला भेट दिली. मजूरांना राज्याच्या सीमेवर पोहोचविण्याची व्यवस्था करताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन होईल याकडे लक्ष देण्याच्या त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. परराज्यातील नागरिकांना एसटीद्वारे राज्याच्या सीमेवर पोहोचविण्याच्या नियोजनाबाबत त्यांनी माहिती घेतली.