नवापूरला मोकाट कुत्र्यांचा लहान मुलांवर हल्ला

0

संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज
नवापूर:शहरात मोकाट कुत्री उदंड झाली असुन ही मोकाट कुत्री लहान मुलांवर हल्ला करत आहेत. त्यामुळे मोकाट कुत्रे लहान मुलांच्या जीवावर उठले आहे. हल्ला करणार्‍या मुलांवर नंदुरबार येथे उपचार आहे. मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली कशी? अशा प्रश्‍न जनतेतून उपस्थित होत आहे. वारंवार घडणार्‍या घटनांमुळे जनतेत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची अपेक्षा जनतेने व्यक्त केली आहे.

शहरातील भोईगल्ली येथे गुरुवारी, 18 रोजी लहान मुलीवर कुत्र्यांनी हल्ला केल्यावर परिसरातील लोक धावुन आले होते. त्यांनी मुलीला वाचविले. तिला हाताला खरचटले होते. तसेच दुसर्‍या दिवशी शुक्रवारी, 19 रोजी 11 वर्षाच्या मुलाच्या पाठीला कुत्र्याने चावा घेतला. भोई गल्लीतील चेतन मोरे यांच्या घरामागे ही घटना घडली. त्यानंतर दोन ते अडीच वाजेच्या दरम्यान नेहरू नगर व देवलफळीतील काही तरुण मुले त्या कुत्र्याच्या शोधार्थ भोईगल्ली नाला, रंगावली कॉलनी मागील झाडी येथे निघाली होती. त्यांना विचारणा केल्यावर त्यांनी चार लहान मुलांना मोकाट कुत्र्यांनी चावा घेतल्याचे सांगितले. यापैकी दोन लहान मुलांना जास्त इजा झाली आहे. म्हणून त्यांना नंदुरबारच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

कुत्र्यांची शोध मोहीम सुरु करा
शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली असून कुत्र्यांची झुंड गल्लीबोळात फिरतांना दिसत आहे. रंगावली नदी किनारी जनावरांचे मांस टाकले जात असल्याने तेथे कुत्र्यांची संख्या जास्त पहायला मिळते. लोकांनी दिलेल्या माहितीनुसार गुजरात व अन्य भागातून रात्री बेरात्री कुत्र्यांनी भरलेला टेम्पो येऊन मोकाट परिसर पाहुन त्यांना सोडले जात असल्याचे प्रकार होत आहे. मोकाट कुत्र्यांचा हैदोस वाढल्याने एखाद्याचा जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. नवापूर शहरात काही वर्षापुर्वी कुत्रे चावल्याने दोन लोकांचा जीव गेल्याचे सांगण्यात आले. नगर पालिकेने मोकाट कुत्र्यांची शोध मोहीम सुरु करुन त्यांचा बंदोबस्त लावण्याची मागणी होत आहे.