नवापूर- शहर व परीसरामध्ये अव्वाच्या सव्वा विद्युत बिले येण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असल्याने संताप व्यक्त होत आहे. ऐन सणासुदीतच वीज ग्राहकांना वाढीव दाराचा शॉक सहन करावा लागणार आहे. दिवाळी सण सोडून नवापूर शहरापासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात नागरीकांना हेलपाटे मारावे लागत आहे. दिवाळी सणासुदीला जेमतेम उसनवारी पैसे घेऊन सण साजरे करणारे काही ग्राहकांना अव्वाच्या सव्वा विद्युत बिले आल्याने संतापाचा पारा चढला आहे. काही राजकीय पुढा-यांना देखील सणासुदीला जनसामान्यांच्या समस्याकडे लक्ष देण्यास वेळ नाही .महावितरणच्या या भोंगळ कारभारामुळे प्रत्येक महिन्याला वीज बिल आले की महावितरणच्या दारात जावे लागत असून याबाबत अधिकार्यांना विचारणा केली असता ‘अहो… तुमचा मीटरंच फॉल्टी आहे!’ असे बिनधास्त उत्तर दिले जाते.ग्राहकांच्या वाढत्या तक्रारी सोडवण्यासाठी महावितरण सक्षम नसल्यानेच कारभाराचे तीन-तेरा वाजले आहेत. याबाबत वरिष्ठ अधिकार्यांकडून कोणतीच कारवाई केली जात नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.