नवापूर । शहराच्या मध्यवर्ती भागात इंदिरा नगर परिसरातील नाल्याची साफसफाईची करण्याची मागणी वारंवार करूनही नगर पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने डासांचा प्रर्दुभाव वाढला असून साथीच्या आजारांत वाढ झाली असल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. मुख्याधिकार्यांनी रविवारपर्यंत नाला सफाई न केल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. शहरातील मध्यवर्ती भागात असलेले इंदिरा नगर परिसरात नाल्यात पावसाळ्या पूर्वी नगर पालिकेने सुमारे 2 कोटी रु खर्चून संरक्षण भिंतीचे कामे करण्यात आली. परंतु संबधित ठेकेदार आणि कामचुकार धोरण असलेली नवापूर नगर पालिकेच्या निष्काळजीपणामुळे ठेकेदाराने खोदकाम केलेले माती ,दगड, इतर साहित्य नाल्यातच टाकून दिल्याने पाण्याचा प्रवाह सर्वत्र आडल्याने ठीकठिकाणी डबके साचलेले असून परिसरात दुर्गंधी व मच्छर डासांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात झाल्याने साथीचे आजार दिवसेदिवस वाढतच आहे.
नागरिकांमध्ये भितीचे वातावरण
नागरिकांनी वारंवार पाठपुरावा करूनही नगर पालिका प्रशासन सुस्त राहिल्याने नागरिकांमध्ये रोष पहायला मिळत आहे. नाल्याची साफसफाई वेळीच झाली असती तर साथ रोगांना आमंत्रण दिले गेले नसते. साथ रोगांनी लहान मुले त्रस्त झाली आहेत. यातच डेंग्यू सदृष्य आजाराची लक्षण आढळून येत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. आरोग्य अधिकारी व बांधकाम अधिकारी यांनी नाल्याची तक्रार दूर केली नसल्यानेच साथ रोगांची लागण होत असल्याची तक्रार नागरिक करीत आहेत.
अधिकारी आश्वासन विसरले
त्यांनी स्थळपाहणी करून परिस्थिती गंभीर असल्याचे मान्य करीत दोन दिवसात नाला सफाईचे आश्वासन दिले होते. परंतु अधिकार्यांनी जाणीव पूर्वक दुर्लक्ष करीत आजतागायत नाला सफाई न झाल्याने आज गुरूवार 16 नोव्हेंबर रोजी मुख्याधिकारी यांना रविवारपर्यंत नाला सफाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला असून भीक मांगो आंदोलन करून गोळा झालेल्या रकमेतून सफाई केलेला कचरा (घाण) पालिक का कार्यालयात आणून टाकण्याचा इशारा दिला आहे.
वारंवार केला पाठपुरावा
आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून त्यासाठी परिसरातील नागरिकांनी वेळोवेळी नगर पालिकेला मौखिक व लेखी स्वरूपात निवेदन देऊन हि दुर्लक्ष करीत असल्याचे निदर्शनास येत आल्याचं समजल्यावर व शहरात बर्याच भागात डेंग्यू सदृश्य रूग्ण आढळत असल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण दिसत आहे. आघाडीचे मंगेश येवले नितीन देसाई ,जयेश चांदेकर, रवींद्र सोनवणे यांनी पालिकेच्या बांधकाम व आरोग्य अधिकारी यांना धारेवर धरत प्रत्यक्ष पाहणी करण्यास भाग पाडले.