नवापूर। शहरातील इंदिरानगर भागातील नाल्यावर पूल बांधला जात असून, हे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. हे काम अद्यापही अपूर्ण आहे. तसेच नाल्याची स्वच्छताही करण्यात आलेली नाही. सात दिवसांच्या आत हा प्रश्न सोडवावा, या मागणीसाठी इंदिरानगर बजरंग चौक भागातील नागरिकांनी नगराध्यक्षा रेणुका गावित, तहसीलदार प्रमोद वसावे नगरपालिकेचे मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे यांना निवेदन दिले.
शहरातील इंदिरानगर बजरंग चौक या भागात कित्येक महिन्यांपासून नाल्याच्या संरक्षण भिंतीचे बांधकाम सुरू आहे. या कामाच्या नियोजनाकडे दुर्लक्ष झाले आहे. पावसाळ्यापूर्वी नाल्याची साफसफाई करणे आवश्यक असताना अद्यापही नाल्यात अनेक ठिकाणी गाळ तसाच पडून आहे. त्यामुळे नाल्यात पाणी तुंबते. त्यातून परिसरात दुर्गंधी पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नागरिकांना या भागातून जाताना कसरत करावी लागते. पुलाजवळ नाल्याच्या संरक्षण भिंतीचे काम अपूर्ण आहे. त्यामुळे हे काम तातडीने करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.