नवापूर शहरातील वाहतूक व्यवस्था बिघडली

0

नवापूर। शहरातील मेनरोड, लाईट बाजार भागात रोजच ट्राफिक जाम होऊन तासनतास वाहने ठप्प होत असतात. शाळा, मंदिर, मशीद, मुख्य बाजारपेठ, गुजरातकडे जाणारा रस्ता असल्याने वाहने या मार्गावरून मोठ्या प्रमाणावर ये-जा करतात. त्यामुळे याभागात वारंवार वाहनाची गर्दी होते. तसेच बाबासाहेब आंबेडकर रोडवर भाजीपाला विक्रेते बसतात त्यामुळे येथे रोजचा ट्राफिक जाम समस्या गंभीर बनली आहे.

वाहतूक सुरूळीत करण्यासाठी पोलिसांची दमछाक
नगरपालिका कार्यालयाजवळ फेरीवाले, लॉरीवाले वरून भाजीपाला विक्रेते व्यवसाय करतात. हा रस्ता अरुंद आहे. तसेच या मार्गावर व्यापारी संकुल व दुकाने मोठ्या संख्येने असल्याने पार्किंगची सोय नाही. या भागात ट्राफिक पोलीस ठेवण्यात आला आहे. येथे ट्राफिकजाम झाल्यास वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागते. ट्राफिकजाम होण्याचे मुख्य कारण म्हणजे जडवाहनांचा प्रवेश आहे. ट्रक, टेम्पो यासारखी जडवाहने येथे येत असल्याने वाहने पुढे जाण्यास अडथळा निर्माण होऊन वाहतुकीची कोंडी होत असते. दुतर्फा बाजूस बॅरीकेट लावून जडवाहनाना बंदी केली होती त्यावेळी वाहतूक व्यवस्था सुरळीत झाली होती नवापूरकरांनी या निर्णयाचे त्यावेळी स्वागत केले होते. मात्र सत्तांतर झाल्यानंतर बॅरीकेट्स पण काढून टाकण्यात आले. काही महिन्यांपूर्वी जड वाहनांनी बॅरीकेट्सला ठोस देऊन दोन तीन वेळा ते तोडून टाकले आहे. त्यानंतर बॅरीकेट्स लावणे नगरपालिकेने सोडून दिले. नवापूर शहरात वाहतूक व्यवस्थेवर कायमस्वरूपी उपाय योजना करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.