नवापूर शहरात ठिकठिकाणी मुतारींची व्यवस्था करा

0

नवापूर । शहरात लाईट बाजार ,सिंधी मार्केट, मच्छीबाजार परिसरात स्वच्छता गृहच नसल्याने बाजाराला येणार्‍या महिला व पुरुषांना आपली नैसर्गिक विधीसाठी नाईलाजास्तव कुठेही भिंतीचा आडोसा शोधून आपली नैसर्गिक विधी पार पाडताना दिसत असल्याचे विदारक चित्र दिसते. शहरात मुतारीचा वणवा असुन लोकांना शोधून ती सापडत नाही. लाईट बाजारात एक मुतारी या अगोदर होती ती ही काही वर्षापुर्वी जमीनदोस्त करण्यात आली आहे. तरी शहरात ठिकठिकाणी मुतारीची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी मंगेश येवले यांनी तहसीलदार व प्रभारी मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात केली आहे.

तहसीलदारांना दिले निवेदन
तालुक्यातील गाव पाड्यावरून येणार्‍या स्त्री पुरूषांना यामुळे मोठी गैरसोय होत असते. काही दिवसापुर्वी जिल्हाधिकारी डॉ मल्लिनाथ कलशेट्टी नवापूर दौर्‍यावर आले असता काही नागरिकांनी नगर पालिका कार्यालयात जाऊन शहरातील अस्वच्छता व मुतारीचा गंभीर प्रश्न निदर्शनास आणून दिला होता. तरी ही नगर पालिका प्रशासन जागे झाले नाही. शहरात मुख्य भागात स्वच्छता गृह निर्माण करण्याची आवश्यकता असल्याची नागरिकांची मागणी आहे. शहरातील नगर पालिका मालकीचे शॉपिंग सेंटर तसेच खाजगी मालक असलेल्या शॉपिंग सेंटरमध्ये हि सर्व नगर पालिका नियमांना केराची टोपली दाखवत कोठेही स्वच्छता गृह बांधलेले नाही. याबाबत अनेक सामाजिक व राजकीय तसेच व्यापारी संघटनांनी याबाबत वारंवार तक्रारी केल्या आहेत. मात्र नगर पालिकेने आज पावेतो याबाबत कुठलेही पाऊल उचल्याचे निदर्शनास आलेले नाही. 30 एप्रिल पावेतो नगर पालिकेने सच्छतागृहाची निर्मिती न केल्यास 1 मे आंतरराष्ट्रीय कामगार दिनी नगर पालिका कार्यालया समोर बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याचे नमूद केले आहे. याबाबत तहसीलदार प्रमोद वसावे व प्रभारी मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना निवेदन देण्यात आले आहे.