जळगाव । एसटी महामंडळाच्या बसमधून प्रवास करत असताना सीटवरील जागेवरून दोन दाम्पत्यात वाद झाला, तर एकाने स्पर्श केल्याचा महिलेने संशय व्यक्त केल्याने बसस्थानकामध्ये दाम्पत्यास जबर मारहाण केल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. यावेळी वाद सुरू असतांना बघ्यांची चांगलीच गर्दी जमली होती. यानंतर एसटी कर्मचार्यांना घटना लक्षात येताच त्यांनी दोन्ही दाम्पत्यांची समजूत घातली. यात परप्रांतिय इसमाने बंगाल येथे पोलीस निरीक्षक असल्याचा दावा केल्याने चांगलाच गोंधळ उडाला. यानंतर त्यांना पोलिसात तक्रार देण्याचा सल्ला देण्यात आला.
महिलांची आरडा-ओरड
महामंडळाच्या अंजिठा-जळगाव बसमध्ये सीटवर बसण्यावरून दोन दाम्पत्यातील वादाला तोंड फुटले. हा वाद बसमध्येच विकोपाला गेला. दोन्ही महिलांनी जोरजोरात आवाज काढल्याने सगळया प्रवाश्यांचे लक्ष या प्रकाराकडे वेधले गेले. दरम्यान पश्चिम बंगाल दाम्पत्यातील पुरूषाने स्पर्श केल्याचा संशय दुसर्या महिलेने घेतल्याने भांडण वाढले. संशय घेणार्या महिलेने मोबाईलवरून या प्रकाराची माहिती कुटुंबियांना दिली.
महिलेच्या नातेवाईकांकडून मारहाण
अजिंंठा जळगाव ही बस येथील नवीन बसस्थानकात पोहोचताच संशय घेणार्या दाम्पत्यासह धावून आलेल्या नातेवाईकांनी बंगाली दाम्पत्यास त्यांचे काहीही म्हणणे न एैकता त्यांना मारहाण सुरू करण्यात आली. प्रकार लक्षात येताच एस.टी.कर्मचारी गोपाळ पाटील, संजय सुर्यवंशी, लिलाधर साळुंखे, सोपान सपकाळे, प्रकाश पाटील यांनी घटनास्थळी धाव घेवून दोन्ही दाम्पत्यांना समजविण्याचा प्रयत्न केला.
पोलिस निरक्षक असल्याचा दावा
मारहाण करण्यात आलेल्या बंगाली व्यक्तीने आपण बंगालमध्ये पोलीस निरीक्षक असल्याचा दावा केला. बराच वेळ त्यांना चौकीत बसवून चौकशी करण्यात आली. त्यांच्यावर बेतलेल्या प्रसंगाबददल त्यांना तक्रार करण्याचा सल्ला पोलीसांना दिला. दरम्यान नेमके घडले काय? हे जाणून घेण्यासाठी अन्य प्रवाश्यांनी धाव घेतल्याने पोलीस चौकीला गर्दीचे स्वरूप प्राप्त झाले. यानंतर एक ते दिड तासानंतर बसस्थानकावर सुरू असलेला वाद अखेर शांत झाला. मात्र, या घटनेमुळे चांगलाच गोंधळ उडाला होता.