पीएमआरडीए कार्यालयात झालेल्या बैठकीमध्ये मागणी; आयुक्त नसल्यामुळे नाराजीचा सूर
वाघोली : वाघोलीमध्ये पाणी, सांडपाणी व्यवस्था , रस्ते, कचरा व्यवस्थापनाच्या गंभीर समस्या भेडसावत आहेत. जोपर्यंत समस्या सोडविल्या जात नाहीत तोपर्यंत नविन बांधकाम प्रकल्पांना मंजुरी देवू नये व बांधकाम पुर्णत्वाच्या परवानग्या दिलेल्या बिल्डरच्या प्रकल्पांची फेरतपासणी करुन दोषी बिल्डरवर कारवाई करावी अशी मागणी वाघोली ग्रामस्थ व वाघोली हाऊसिंग सोसायटीच्या सदस्यांनी पीएमआरडीए कार्यालयात बोलविण्यात आलेल्या बैठकीमध्ये केली आहे.
पीएमआरडीए हद्दीमध्ये वाघोली परिसरातील गृह प्रकल्प (सोसायटी) व गृह प्रकल्पांचे विकसक (बिल्डर) यांच्यामध्ये समन्वय साधण्यासाठी पीएमआरडीएच्या औंध येथील कार्यालयामध्ये बैठक बोलविण्यात आली होती. यावेळी आमदार बाबुराव पाचर्णे, पीएमआरडीएचे मुख्य अभियंता सुनिल वांढेकर, अधिक्षक अभियंता बी. डी. यमगर, सल्लागार पाठक, सरपंच वसुंधरा उबाळे, उपसरपंच रामकृष्ण सातव, माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास दाभाडे, शिवदास उबाळे, संदिप सातव, समीर भाडळे, ग्रामस्थ, वाघोली हौसिंग सोसायटीचे सदस्य उपस्थित होते.
तपासणी अभावी बिल्डर मोकाट
बैठकीच्या सुरुवातीलाच पाणी, ड्रेनेज, कचरा, रस्ते आदि मुलभुत सुविधा पीएमआरडीए व संबंधित विभागाने उपलब्ध करुन द्याव्यात अशी मागणी करीत सोसायटी धारक व ग्रामस्थांना या मुलभुत सुविधा मिळत नसल्याने येणार्या समस्यांची माहीती दिली गेली. त्याचप्रमाणे बिल्डरने मुलभुत सुविधा उपलब्ध करुन दिले नसताना पीएमआरडीए कडून पुर्णत्वाचा दाखला घेवून केलेल्या उचापतींचे कथन यावेळी करण्यात आले. अनेक फ्लॅट धारकांना बिल्डरने फसविल्याच्या तक्रारी केल्या गेल्या. त्याचप्रमाणे बिल्डरने गृहप्रकल्प पुर्ण केल्यानंतर पीएमआरडीए कडून कोणत्याही प्रकारची तपासणी होत नसल्याने बिल्डर मोकाट असल्याचे निदर्शनास आणून दिले.
दोषींवर कारवाई करावी
सोसायटी धारक आणि ग्रामस्थांना मुलभुत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी ग्रामपंचायत तयार असून त्यासाठी पीएमआरडीएने मदत करावी तसेच पाणी, कचरा, ड्रेनेजचे प्रकल्प उभारण्यासाठी जागा, निधी उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी ग्रामपंचायतीच्या वतीने बैठकीमध्ये करण्यात आली. तसेच संबंधित दोषी बिल्डरांना नोटीसा काढाव्यात अशी मागणी यावेळी आमदार पाचर्णे यांनी केली. वाघोलीच्या सर्वांगीण विकासासाठी पीएमआरडीए आणि ग्रामपंचायतीचे समन्वय सातत्याने होणे गरजेचे असल्याचा सूर बैठकीमध्ये निघाला.
आयुक्तांची गैरहजेरी
बैठकीला पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते हजर नसल्याने उपस्थितांनी नाराजी व्यक्त केली. वाघोलीच्या समस्यां संदर्भात ग्रामस्थ, ग्रामपंचायत, सोसायटी धारकांनी मांडलेल्या समस्यांचे टिपण करण्यात आले असून याबाबत आयुक्त किरण गित्ते यांच्याशी चर्चा करुन पुन्हा बैठकीतून मार्ग काढले जातील असे मुख्य अभियंता सुनील वांढेकर यांनी सांगितले.
-पीएमआरडीए च्या स्थापनेपासून वाघोली गावातून सर्वाधिक महसूल मिळत असताना तीन वर्षामध्ये मुलभुत सुविधांसाठी ठोस निर्णय वाघोलीसाठी घेतला गेला नाही. मुलभुत सुविधा सोडविण्यासाठी ग्रामपंचायत सदैव तत्पर आहे. परंतु पीएमआरडीएने मदत करणे गरजेचे आहे. समस्या सोडविण्यासाठी आवश्यक निधी, जागा उपलब्ध करुन देवून बिल्डरांनी ओढे नाल्यावर केलेल्या अतिक्रमणांवर कारवाई करणे गरजेचे आहे. पीएमआरडीएच्या सहकार्यानेच विकास होवू शकतो
-रामकृष्ण सातव, उपसरपंच