नवीन बसस्थानकावर पाकिटमारास पकडले

0

जळगाव । नवीन बस स्थानकात चोरट्यांचा उच्छाद सुरुच आहे. बुधवारी परभणी जिल्ह्यातील व्यापार्‍याचे दागिने लांबविण्याच्या घटनेची चर्चा थांबत नाही तोच आज पुन्हा एका प्रवाशाचे चोरट्यांनी पाकीट लांबविल्याची घटना घडली. पोलीस मुख्यालयासमोरच असलेल्या बस स्थानकात चोरट्यांचा धुमाकूळ सुरु आहे. चोरट्यांना पोलिसांची भीती नसल्याने प्रवासी भयभीत झाले आहेत.

अशी घडली घटना
बसमध्ये चढताना प्रवाशाचे पाकीट चोरणार्‍या महादेव भिमराव जाधव (वय 25, रा.कोळंबी, जि.अकोला) याला गुरुवारी दुपारी साडे बारा वाजता जिल्हा पेठ पोलिसांनी पकडले. त्याच्याविरुध्द जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. बाबासाहेब रामदास शिंदे (रा.गणेशवाडी, जळगाव) यांची पत्नी लक्ष्मी यांना सिल्लोड जायचे असल्याने शिंदे हे गुरुवारी दुपारी पत्नीला सोडण्यासाठी नवीन बसस्थानकात आले होते. रावेर-पुणे बसमध्ये चढत असताना शिंदे यांच्या खिशातील पाकीट कोणीतरी लांबविले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर शिंदे यांनी आरडाओरड केली. यावेळी बंदोबस्तावर असलेले जिल्हा पेठ पोलीस स्टेशनचे रवी तायडे, मनोज कोळी व रवींद्र पाटील हे गर्दी असल्याने त्याच बसजवळ थांबलेले होते. त्याला त्यांनी लागलीच पकडले. या पाकीटात पाचशे रुपये व अन्य कागदपत्रे होती. महादेव हा मुंबई येथे गेला होता, तेथून परत येत असताना तो जळगावला मित्राकडे उतरला होता, असे त्याने चौकशीत पोलिसांना सागितले.