नवीन मलनिस्सारण वाहिन्या तत्काळ जोडा

0

नेरुळ । जुईगर सेक्टर 24 मधील ओमकार, पंचरत्न, महालक्ष्मी, सिध्दिविनायक या गृहनिर्माण सोसायट्यांमधील रहिवाशांना मल:निस्सारण वाहिन्यांच्या चोकअपमुळे होत असलेल्या त्रासाकडे महापालिका आयुक्तांचे लक्ष वेधताना इंटकचे नवी मुंबई अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी संबंधित सोसायटीमध्ये आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याने तातडीने नवीन मलनिस्सारण वाहिन्या जोडून देण्याची लेखी मागणी केली आहे. या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये अल्प व मध्य उत्पन्न गटातील रहिवासी वास्तव्य करत असून मलनिस्सारण वाहिन्यांच्या गळतीमुळे त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झालेला आहे. या गृहनिर्माण सोसायट्यांच्या प्रवेशद्वारालगतच तसेच सभोवतालच्या परिसरात मलनिस्सारण वाहिन्या या अरूंद असून ही वाहिनी सातत्याने चोकअप होत आहे. ही वाहिनी जमिनीमध्ये दहा ते फूट खोल असुन महापालिकेच्या संबंधित कामगारांना या मलनिस्सारण वाहिनीची साफसफाई करणे त्रासदायक ठरत असल्याचे रवींद्र सावंत यांनी महापालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला आहे.

नाक मुठीत धरून प्रवास
या मलनिस्सारण वाहिन्या चोकअप होऊन तुंबलेले पाणी बाहेर पडते. या पाण्यामध्ये मलमूत्र, दुर्गंधी यामुळे स्थानिक रहिवाशांना वावरणे अवघड झाले असून त्यांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झालेला आहे. या परिसरात मंगलप्रभू हॉस्पिटलजवळ मोठ्या व्यासाची मलनिस्सारण वाहिनी आहे. या चारही सोसायट्यांना जोडण्यात आलेली मल:निस्सारण वाहिनी सोसायट्यांच्या पाठीमागील बाजूने काढून मंगलप्रभू हॉस्पिटलच्या वाहिनीला जोडल्यास या रहीवाशांची समस्या कायमस्वरूपी संपुष्ठात येणार असल्याचे सावंत यांनी निवेदनात म्हटले आहे. मलनिस्सारण वाहिन्या चोकअप झाल्याने सोसायटी सभोवतालच्या परिसरालाही बकालपणा असून नागरिकांना नाक मुठीत ठेवून अनेकदा ये-जा करावी लागत आहे. रहिवाशांच्या आरोग्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यानेे समस्येचे गांभीर्यही आयुक्तांच्या तात्काळ निदर्शनास येईल. आयुक्तांनी स्वत: या ठिकाणी येवून समस्येची खातरजमा करून या बाबत दखल घेण्याची मागणी रवींद्र सावंत यांनी केली आहे.