नवीन मुठा कालव्यावरील पूल कोसळला

0

वाहतुकीचा प्रश्‍न गंभीर : आमदार कुल यांनी घेतली बैठक

दौंड : बोरीभडक येथील दुरवस्था झालेला नवीन मुठा कालव्यावरील पूल कोसळल्याची घटना घडली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. काही वर्षांपासून बोरीभडक गावाकडे जाणार्‍या रस्त्यावरील पूल धोकादायक बनला होता. पाटबंधारे विभागाने पुलावरील वाहतूक बंद केली होती. मात्र, एका महिन्यापूर्वी गावातील काही युवकांनी पुलाच्या बाजूला टाकलेले काटे हटवून परत पुलावरून वाहतूक सुरू केली होती. मात्र, वाहतूक सुरू झाली असली तरी अवजड वाहतूक पुलावरून होत नव्हती.

पुलाचे काम सुरू होण्यास विलंब

बोरीभडक गावाकडे जाणार्‍या मुख्य रस्त्यावर असणारा पूल कोसळल्याने गावातील ग्रामस्थांना मोठा वळसा घालून बोरीऐंदी गावाकडे जाणार्‍या पुलाचा वापर वाहतुकीसाठी करावा लागणार आहे. मात्र, बोरीऐंदीच्या रस्त्यावरील पूलदेखील मोडकळीस आलेला असल्याने त्याही पुलावरून वाहतूक धोकादायक बनली आहे. भविष्यात तोही पूल पडल्यास हजारो नागरिकांची मोठी गौरसोय होऊ शकते. काही दिवसांपूर्वीच नवीन मुठा कालव्याचे आवर्तन सुरू झाले आहे. यामुळे नवीन पुलाचे काम सुरू होण्यास विलंब होण्याची शक्यता आहे. पुल कोसळल्याने वाहतुकीचा प्रश्‍न निर्माण झाल्याने नागरिकांची मोठी अडचण झाली आहे.

लवकरच कामाला सुरुवात

आमदार राहुल कुल यांनी खडकवासला पाटबंधारे विभागाचे मुख्य अधिकारी पांडुरंग शेलार व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आर. वाय. पाटील यांच्यासमवेत बैठक घेऊन त्यावर खांबविरहित रचना असलेला पूल बांधण्याचे ठरले होते. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने सदर रचना बदलून दिल्यानंतर जलसंपदा विभागानेदेखील नवीन खांबविरहित पुलाच्या रचनेला मान्यता दिली असून, लवकरच पुलाचे सुरू केले जाईल, अशी माहिती आमदार राहुल कुल यांनी दिली.