भोंडवे सोसायटीमध्ये रोटरी क्लबचा उपक्रम
रावेत : पाणी ही काळाची गरज आहे. दिवसेंदिवस पाण्याचा दुष्काळ वाढतच आहे. नजीकच्या काळात एकदिवसा आड पाणी येईल, अशी परिस्थिती आली आहे. याची जाणीव ठेवुन भोंडवे एम्पायर सोसायटी रावेत येथील तरुणांनी एकत्र येऊन पाणी वाचविण्यासाठी नळांना एरेटर बसविले आहेत. सोसायटीमध्ये पाणी बचतीचे महत्व, उपाय आणि आपली जबाबदारी या विषयावर जनजागृतीपर मार्गदर्शन कार्यक्रम रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीच्या सदस्यांनी घेऊन नागरिकांचे गणेशोत्सव काळात प्रबोधन करून पवनानदी स्वछतेसाठी पाणी बचतीचे आवाहन केले होते. त्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत भोंडवे एम्पायरमधील रहिवाशांनी पाणी बचतीसाठी हे पाऊल उचलले. यासाठी सोसायटीचे चेयरमन दयानंद पागम, इशा सराफ, तेजस देशपांडे आणि सोसायटी कमिटीच्या सर्व सदस्यांनी पुढाकार घेतला.
हे देखील वाचा
100 ली. पाणी वाचविणार
कामवाली बाई भांडी धुणे करताना किंवा घरातील लहान मुले ब्रश करताना बरेच वेळा पाण्याचा नळ सुरुच रहातो व भरपुर प्रमाणात पाणी वाया जाते. त्यामुळे घरात येणार्या पाण्याचा नळ अर्धा बंद केला तर पाण्याचा दाब कमी होतो. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन पाणी वाचवणारे एरेटर्स बसविले आहेत. आत्ताच्या नळातुन मिनिटाला 12 लीटर पाणी येत असे तर अश्याप्रकारच्या एरेटर बसविल्यानंतर मिनिटाला 3 लीटर पाणी येते आहे. दिवसभरात एका घरात किमान 100 लीटर पाणी वाचवले जाईल. तब्बल 200 नळांना ऐरेटर्स बसवून हजारो लिटर पाणी बचतीची सुरवात नववर्षाच्या पूर्वसंध्येला करून भोंडवे एम्पायरमधील रहिवाशांनी एक आदर्श निर्माण केला आहे. रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी मार्फत याचे प्रबोधन व प्रात्यक्षिक दिले जाईल.