नवी दिल्ली : 1 जानेवारी 2018 पासून काही आर्थिक व्यवहारांमध्ये बदल होणार असून, यापैकी काही बदलांमुळे बचत वाढेल तर काहीमुळे नुकसानदेखील होऊ शकते. डेबिट कार्ड आणि भीम अॅपद्वारे पेमेंट केल्यास शुल्कामध्ये सूट मिळेल. तसेच कार आणि दुचाकी खरेदी करणे महागणार आहे. लहान बचत योजनांवर व्याजही कमी मिळणार आहे. देशभरातील शेतकर्यांना 1 जानेवारीपासून त्यांच्या खतांवरील सबसीडी बँक खात्यात मिळणार आहे.
कार्डवर दोन हजार रुपयांपर्यंत शुल्क नाही
नवीन वर्षात म्हणजे 2018 मध्ये डेबीट कार्डवर दोन हजारपर्यंत व्यवहार केल्यास शुल्क आकारले जाणार नाही. डेबीट कार्डशिवाय भीम अॅप, युपीआय या आधार एनेबल्ड पेमेंट सिस्टीमसाठी दोन हजार रूपयांपर्यंतच्या व्यवहारांवर शुल्क आकारले जाणार नाहीत. या दोन हजार रूपयांपर्यंतच्या खरेदीवर लागणारे मर्चंट डिस्काउंट रेट सरकारकडून बँकांना दिले जाईल. सध्या दुकानदार ग्राहकांकडून त्याची वसुली करून ही रक्कम बँकांना देतात. मात्र, दोन हजार रूपयांवरील व्यवहारासाठी शुल्क लागू असणार आहे.
लघु बचत योजनेत व्याज कमी
लघु बचत योजनांमध्येही नवीन वर्षात काही बदल होणार आहेत. लघु बचत योजनांवर 0.2 टक्के कमी व्याज यापुढे मिळणार आहे. जानेवारी, मार्च तिमाहीमध्ये एनएससी आणि पीपीएफ 7.6 टक्के व्याज मिळेल. किसान विकास पत्रावरील 7.3 टक्के आणि सुकन्या समृद्धीवर 8.1 टक्के व्याजदर मिळणार आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी बचत योजनांवर 8.3 टक्के व्याजदार मात्र कायम ठेवण्यात आला आहे.
डीबीटी सुरू होणार; 1 जूनपासून ई-वे बिल
शेतकर्यांना सरकारकडून मिळणारी अनुदानाची रक्कमही आता थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे. देशातील 14 राज्य वगळता देशभरात अशा पद्धतीने शेतकर्याना अनुदान दिले जाईल. गुजरात, झारखंड, बिहार अशा राज्यांमध्ये सध्या अशाप्रकारे शेतकर्यांच्या खात्यात थेट अनुदान जमा होणार आहे. यास डीबीटी असे म्हटले जाते. नवीन वर्षात 1 फेब्रुवारीपासून इतर राज्यांत मालाचा पुरवठा करण्यासाठी ई-वे बिल गरजेचे असणार आहे. राज्यांतर्गत पुरवठा करण्यासाठी 1 जूनपासून ई-वे बिल गरजेचे असेल. या बिलाचा नमुना संबंधितांना 15 जानेवारीला मिळणार आहे. त्यानंतर दोन आठवडे चाचणी करून त्यानंतर ही पद्धत आंमलात येणार आहे.
सर्वच कार महागणार
नवीन वर्षात वाहन उद्योग क्षेत्रातही बरेच बदल होणार आहेत. कारच्या किमती जवळपास 25 हजार रूपयांनी वाढणार आहेत. मारूतीने 22 हजार, फॉक्सवॅगनने 20 हजार, टाटा मोटर्स आणि होंडाने 25 हजार रूपये तसेच टोयोटा, स्कोडा आणि महिंद्राने 3 टक्क्यांंपर्यंत किंमती वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच काही कंपन्यांच्या दुचाकीही महागणार आहेत.