नवीन वर्षात एसटी होणार वायफाय!

0

मुंबई : नवीन वर्षात राज्यातील एसटीच्या सर्व 18 हजार बसमध्ये वाय-फाय बसविण्याचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. या कामाला जानेवारी महिन्यापासून सुरुवात केली जाणार असून, हे काम पूर्ण होताच, संपूर्ण एसटी ‘वाय-फाय’मय होणार आहे. यासाठी राज्य परिवहन महामंडळाला 90 कोटी रुपये खर्च येणार आहे, खासगी कंपनीला हे कंत्राट देण्यात आले आहे.

पुण्यातील बसेस झाल्या वाय-फायसज्ज
प्रवाशांसाठी बसमध्ये वाय-फाय सेवा देण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आणि त्यानुसार प्रथम पुण्यातील स्वारगेट, तसेच शिवाजीनगर आगारांतर्गत येणार्‍या सर्व बसमध्ये वाय-फाय बसविण्याचा कामाला 2016 सप्टेंबरपासून सुरुवात केली. त्यानुसार, या दोन्ही आगारांतील एकूण 295 बसमध्ये वाय-फाय सुविधा बसवण्यात आली. महामंडळाने प्रवाशांकडून मिळणार्‍या चांगल्या प्रतिसादानंतर 18 हजार बसमध्ये वाय-फाय बसविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, वाय-फाय सेवा देणारी संबंधित कंपनी आणि एसटी महामंडळात करारही झाला आहे.

उर्वरित आगारातील बसेसमध्ये लवकरच सेवा
जानेवारी महिन्यापासून मुंबई, नाशिक, अमरावती, नागपूर, औरंगाबाद आणि पुण्यातील अन्य आगारांतर्गत येणार्‍या बसमध्ये वाय-फाय बसविण्यास सुरुवात केली जाईल. यासाठी प्रत्येकी दहा जणांचे अशी सहा पथकेही तयार करण्यात आली आहेत. सध्या एसटीच्या ताफ्यात 18,500 बस असून, यामध्ये शिवनेरी, हिरकणी, साध्या बसचा समावेश आहे. सर्व बसमध्ये वाय-फाय बसविण्यासाठी संबंधित कंपनीला एकूण 90 कोटींचा खर्च आला आहे, तर कंपनीकडून एसटी महामंडळाला प्रत्येक वर्षी 1 कोटी 5 लाख रुपये देण्यात येणार असून, 5 वर्षांचा हा करार असणार आहे.