जळगाव । नवीपेठेतील प्रभात सोडा दुकानासमोर उभ्या असलेल्या दोन चारचाकींचे दरवाजे उघडून शनिवारी चोरट्यांनी लांबविलेल्या दोन बॅगा पोलिसांना सापडल्या असून पोलिसांनी बॅगांची झाडाझडती घेतली असता त्यात फक्त कागदपत्र मिळून आले आहेत. मात्र, त्यातुन रोकड व मोबाईल चोरट्यांनी लंपास केल्याचे निषन्न झाले आहे. यातच शनिवारी घटना घडल्यानंतरच शहर पोलिसांच्या पथकाला मुक्ताईनगरात एक बॅग मिळाली होती. दुसर्या बॅगचा शोध घेत असतांना दुसर्या दिवशी रविवारी शहर पोलिसांना दुसरी बॅग देखील शहरातील जिल्हा परिषदसमोर असलेल्या एका झेरॉक्स दुकानासमोर मिळून आली आहे. शहर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज देखील ताब्यात घेतले असून त्यानुसार चोरट्यांच्या मागावर पोलिस आहेत.
शहरातील विजया बँकेत कामानिमित्त भुसावळातीत उज्वलकुमार नामदेव बोरसे (वय-32) हे शनिवारी दुपारी चारचाकी (क्रं.एमएच.19.सीपी.0091) ने जळगावात आले होते. त्यामुळे त्यांनी त्यांनी प्रभात सोडा दुकानासमोर त्यांची चारचाकी उभी केली होती. बँकेत गेल्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या चारचाकीचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधत चारचाकीतील बॅग काढून पोबारा केला होता. बोरसे हे काम आटोपून आल्यानंतर घटना उघडीस आली होती. त्यांच्या चारचाकी समोरच लावलेल्या अमित सुंदरलाल सेवानी (रा. अमरावती) यांची स्विफ्ट डिझायर कार (क्रं.एमएच.27.एआर.8017) मधून देखील अज्ञात चोरट्यांनी दारवाजा लॉक नसल्याचा संधी पाहत बॅग लांबविल्याचीही घटना त्यांना कळाल्यानंतर दोन्ही चारचाकी मालकांनी शहर पोलिस ठाण्यात गाठून फिर्याद दिली होती.
अन् बॅगा सापडल्या
शनिवारी सायंकाळी बोरसे यांची चोरीला गेलेली बॅग मुक्ताईनगरात चोरट्यानी फेकुन दिल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली. त्यानंतर शहर पोलिस ठाण्यातील दृश्यंत खैरनार, प्रितमसिंग पाटील, अमोल विसपुते, नवजीत चौधरी अशांच्या पथकाने रात्री मुक्ताईनगरासाठी रवाना झाले होते. यानंतर रात्री त्यांना चोरट्यांना फेकून दिलेली बोरसे यांची बॅग मिळाली. मात्र, त्यात कागपत्रांशिवाय काहीही मिळून आले नाही. यानंतर शहर पोलिस दुसर्या बॅगेच्या शोधात असतांना आज रविवारी शहरातील जिल्हा परिषद समोर असलेल्या झेरॉक्स दुकानाचे मालक प्रमोद अनिल बिर्होडे यांना त्यांच्या दुकानाजवळ निळ्या रंगाची बॅग मिळाल्यानंतर त्यांनी शहर पोलिसात संपर्क साधला आणि बॅग सापडल्याची माहिती दिली. पोलिसांनी त्या ठिकाणी जावून बॅगची पाहणी केल्यानंतर अमित सुंदरलाल सेवानी यांची चोरीला गेलेली बॅग असल्याचे समोर आले. पोलिसांनी दोन्ही बॅगा ताब्यात घेतले असून याबाबत बॅगांच्या मुळ मालकांनाही बॅगा सापडल्याची माहिती पोलिसांनी कळविली आहे. बॅगांमध्ये कागदपत्रांशिवाय काहीही मिळून आलेले नाही. चोरट्यांनी रोकड व मोबाईल लंपास करूनच बॅगा फेकून दिल्याचे निषन्न झाले आहेत.
चोरटे सीसीटीव्ही कैद
पोलिसांनी टॉवर चौकातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर दोन ते तीन चोरटे कॅमेर्यात कैद झाले आहेत. यातच बोरसे यांच्या वाहनावरील चालक चारचाकीचे दरवाजे लॉक करतांना एका चोरट्याने चालाखीने दुसर्या बाजूचे दार उघडून उडकवून दिले. यानंतर त्याच्या अन्या दोन साथीदारांनी पैसे पडल्याचा बहाना करत चालकाला ते उचलण्यास सांगितले. चालक पैसे उचलत असतांनाच चोरट्याने लागलीच दरवाजा उघडून चारचाकीतील बॅग चोरून नेली. अशा प्रकारची चोरीची पध्दत भामट्यांनी दुसर्या कारच्या बॅग चोरीच्या वेळीस वापरून दोन बॅगा लांबविल्या आणि रिक्षात बसून बसस्थानकाच्या दिशेने जात असल्याचे सीसीटीव्ही कैद झाले आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावरू पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहेत.