नेरुळ । घनकचरा व्यवस्थापन नियम, 2016 च्या अनुषंगाने निर्मितीच्या जागीच ओला व सुका असे कचर्याचे वर्गीकरण करणे बंधनकारक आहे. ज्या संस्था अशाप्रकारे कचर्यावर प्रक्रिया करणार नाहीत, त्या संस्थांचा कचरा न उचलणेबाबत 15 नोव्हेंबरची डेडलाईन महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या निर्देशानुसार देण्यात आली होती. त्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दैनंदिन 100 कि.ग्रॅ. पेक्षा अधिक कचरा निर्माण करणार्या 68 सोसायट्या आणि 22 हॉटेल्सचा कचरा उचलणे आजपासून बंद करण्यात आले आहे.
प्रत्येकांची स्वच्छतेची जबाबदारी
‘स्वच्छ नवी मुंबई मिशन’ अंतर्गत आपले नवी मुंबई शहर सर्वांगीण स्वच्छ ठेवण्याच्या दृष्टीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत, तसेच व्यापक स्वरूपात जनजागृती मोहीमा राबविण्यात येत आहेत. या कार्यात स्वच्छताप्रेमी नागरिकांचाही बर्याच ठिकाणी उत्स्फूर्त सहयोग मिळत असून यामध्ये प्रत्येक नागरिकांने वैयक्तिक स्वच्छतेप्रमाणेच सार्वजनिक स्वच्छतेची जबाबदारी जाणून स्वयंपूर्ण सहभाग घेणे अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे स्वच्छताविषयक नियमांचे पालन करणेही गरजेचे आहे.
परवाना विभागातर्फे कारवाई
याबाबत महानगरपालिकेने 15 नोव्हेंबर पर्यंतची मुदत मोठ्या सोसायट्या, हॉटेल्स यांनी दिली होती. तरीही याबाबत कार्यवाही न करणार्या सोसायट्या, हॉटेल्स यांचा कचरा न उचलण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी आजपासून सुरू करण्यात आली. याबाबात प्रतिसाद न देणार्या हॉटेल्सवर महानगरपालिकेच्या परवाना विभागामार्फत यापुढील काळात कारवाई करण्यात येणार आहे.