शर्तींची पूर्तता करू शकत नसलेले 35 प्रस्ताव अपात्र
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात कायम विनाअनुदानित तत्वावर नवीन महाविद्यालये सुरू करण्यासाठी 80 शैक्षणिक संस्थांनी इच्छुकता दर्शविली असून प्रस्ताव दाखल केले आहेत. यातील 35 प्रस्ताव हे अटी व शर्तींची पूर्तता करू शकत नसल्याने ते अपात्र ठरविण्यात आले आहेत. राजकीय पुढारी, उद्योजक, व्यापारी, संघटनांचे पदाधिकारी यांच्याकडून दरवर्षी विद्यापीठाशी संलग्नता प्राप्त करून नवीन महाविद्यालये सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असतात. यामुळे महाविद्यालयांची संख्या दरवर्षी वाढते आहे.
महाविद्यालयांची संख्या हजारांपर्यंत पोहचणार
सध्या एकूण 950 महाविद्यालये आहेत. यातील 165 महाविद्यालये अनुदानित असून उर्वरित महाविद्यालये कायम विनाअनुदानित तत्वावरच कार्यरत आहेत. यात प्रामुख्याने कला, वाणिज्य व विज्ञान या शाखांचा समावेश असलेल्या महाविद्यालयांची संख्या अधिक आहे. सन 2019-20 या शैक्षणिक वर्षांपासून यात आणखी वाढ होऊन एकूण महाविद्यालयांची संख्या हजारांपर्यंत पोहचणार आहे. अनुदानितपेक्षा कायम विनाअनुदानित महाविद्यालयांची संख्या अधिक आहे. विद्यार्थ्यांकडून मिळणार्या फीमधूनच कायम विनाअनुदानित महाविद्यालये चालवावी लागतात हे उघड आहे.
महाविद्यालयांची प्रत्यक्ष पाहणी
पुणे जिल्ह्यातील 22, नाशिकमधील 9, अहमदनगरमधील 14 संस्थांचे नवीन महाविद्यालये सुरू करण्यासाठीचे प्रस्ताव पात्र ठरविण्यात आले आहेत. प्राचार्य, प्राध्यापक, संचालक यांचा समावेश असलेल्या समितीकडून प्रस्ताव दाखल केलेल्या महाविद्यालयांची प्रत्यक्ष तपासणी केली आहे. या तपासणीचा अहवाल त्यांनी विद्यापीठाकडे सादर केलेला आहे. विद्यापीठाकडून अंतिम मान्यतेसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवून देण्यात आलेले आहेत, अशी माहिती विद्यापीठातून मिळाली आहे. शासनाकडून लवकरच नवीन महाविद्यालयांच्या परवानगीबाबतचे अंतिम आदेश जारी करण्यात येणार आहेत.