मुरबाड । केवळ भारतातीलच नव्हे तर आशिया खंडात रेल्वे आणण्याचा मान मिळवणार्या नाना शंकर शेठ उर्फ नाना मुरकुटे यांची जन्मभूमी असलेल्या मुरबाड तालुक्यात आतापर्यंत रेल्वे पोहोचू शकली नाही. मुरबाडमध्ये रेल्वे आणू, अशी1970 सालापासून अक्षरशः लोकप्रतिनिधींनी आश्वासनांची खिरापत वाटली आहे. त्यामुळे तालुक्यात रेल्वे न आणणार्या लोकप्रतिनिधींचे हे राजकीय अपयश म्हणावे की त्यांनी केलेला कानाडोळा अशी प्रतिक्रिया मुरबाड तालुक्यातून उमटू लागली आहे. नाना शंकर शेठ यांचा 10 फेब्रुवारी 1803, मुरबाड येथील शंकर मंदिराजवळ असणार्या गोड्याचा पाडा या गावात जन्म झाला. मुंबईच्या 19 व्य शतकातील इतिहासाचे प्रणेते म्हणून नाना शंकर शेठ याना ओळखले जाते. जगन्नाथ शंकर शेठ मुरकुटे यांचे खरे नाव नाना मुरकुटे, नानांचा जन्म दैवज्ञ समाजातल्या पिढीजात श्रीमंत मुरकुटे घराण्यात झाला. सचोटीने व्यापार करून मोठा धनसंचय करावा व त्याचा उपयोग परोपकाराची करावा हे कुटुंबाच्या अनेक पिढ्यांचे तत्त्व होते व त्यामुळे त्यांना सर्वत्र प्रतिष्ठा मिळाली. नानांचे वडील शंकर शेठजी ईस्ट इंडिया कंपनी व इंग्रजांचे सावकार होते. 1800 मध्ये त्यांची संपत्ती 18 लाखांच्या घरात होती. जगातील पहिली रेल्वे इंग्लंड मध्ये 1825 मध्ये सुरू झाली, तर आशिया खंडातील पहिल्या रेल्वेचा प्रस्ताव मुंबईचे शिल्पकार नाना शंकर शेठ यांनी 1844 साली इंग्रजांपुढे ठेवला. 16 एप्रिल 1853 ला साहिब सिंध आणि सुलतान अशी तीन इंजिने असलेली पहिली रेल्वे बोरीबंदर (मुंबई) ते ठाणे अशी धावली या रेल्वे गाडीत 500 लोकांनी एकत्र प्रवास केला. ही गाडी बोरीबंदर येथून 03-30 वाजता निघून 4.58 वाजता ठाणे येथे पोहचली. नंतरच्या पार्टीच्या प्रवासाला निघालेली हीच गाडी बोरीबंदर येथे 6.30 ला पोहोचली. या रेल्वेचे जनक असलेले नाना शंकर शेठ उर्फ नाना मुरकुटे यांच्या अथक प्रयत्नांनी सुरू झालेल्या मुंबई ते ठाणे या रेल्वेमार्गानंतर संपूर्ण देशभर रेल्वेचे जाळे विणले गेले.
मात्र 165 वर्षांच्या कालावधीत मुरबाड ते मुंबई हे केवळ 85 किमी अंतरापर्यंत रेल्वेमार्ग सुरू करण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रातील राजकीय मंडळींना अपयश म्हणावे लागेल का? अशा चर्चेला सध्या उधाण आले आहे. 1965 सालापासून कल्याण ते नगर या रेल्वे मार्गाची मागणी लोकसभेत अनेकदा मांडण्यात आली. मात्र, आजपर्यंत केवळ पोकळ आश्वासनाव्यतिरिक्त काहीच झाले नाही. 1965 पासून ते 2018 पर्यंत कल्याण-माळशेज-नगर-मुरबाड-टिटवाळा या रेल्वेमार्गाबाबत केवळ कागदावरच चर्चा होताना दिसत आहे. तब्बल 22 वषार्ंपेक्षा अधिक काळ रखडलेल्या मात्र ठाणे पुणे आणि अहमदनगर या तीन जिल्ह्यांच्या ग्रामीण भागातील शेतकरी वर्गाला वरदान ठरणार्या कल्याण-अहमदनगर रेल्वे मार्गाच्या प्राथमिक तांत्रिक सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. तरी हा रेल्वे मार्ग बासनात गुंडाळला आहे. तसेच ठाणे, पुणे आणि अहमदनगर तसेच मुरबाड-ओतूर ते अहमदनगर असा जाणारा मार्ग होता. या मार्गावर कल्याण, विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथ, कांबा, आपटी, पाटगाव, मुरबाड, रावगाव, देहरी, मिल्हे, केबिन, बारिवघर, देवराळवाडी, केबिन, मध, जुन्नर रोड, ओतूर, पदरवाडी, माळवाडी, काटेडावाडी, शिंदेवाडी, वासुंदे, धोतरे, भालवानी, हमीतपूर आणि अहमदनगर अशी रेल्वेस्थानके प्रस्तावित करण्यात आली होती. परंतु, आजतागायत रेल्वे अर्थसंकल्पात कुठेही या रेल्वेमार्गाचा उल्लेख झाला नाही. जर झाली असती तर हा मार्ग पूर्णपणे फायद्यात होता असा प्राथमिक रिपोर्ट आला होता. परंतु, या रिपोर्टला सरकारीदरबारी वजन न मिळाल्याने हा रिपोर्ट तसाच धूळखात पडलेला आहे.
राज्य सरकार अर्धा खर्च उचलण्यास तयार
ठाणे जिल्ह्यातील प्रस्तावित रेल्वे प्रकल्प रखडले त्यामुळे लोकप्रतिनिधीची दिल्लीतील ताकद कागदावरच असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील आजी माजी खासदारांनी दिल्लीत रेल्वे बाबत कुठल्याप्रकारचे लढे दिले आहेत हे वास्तव समोर आले आहे. तर मुरबाडमध्ये नव्याने बांधण्यात आलेले हायटेक तहसील कार्यालय यांचे उदघाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले होते. यावेळी आपल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते की, मुरबाड टिटवाळा रेल्वेचा अर्धा खर्च राज्य सरकार उचलेल. मात्र प्रत्यक्षात दोन महिन्यापूर्वी केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर झाला त्यामध्ये कुठेही मुरबाड टिटवाळा रेल्वेचा उल्लेख झाला नाही. त्यामुळे मुरबाडकरांच्या नव्या रेल्वेचे स्वप्न भंगले आहे, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. जर प्रत्यक्षात मुरबाड टिटवाळा रेल्वे मार्गाचा विचार केला गेला असता तर खर्या अर्थाने भारतीय रेल्वेचे जनक नाना शंकर शेठ यांना खर्या अर्थाने आदरांजली ठरली असती.
अजूनही मुरबाड टिटवाळा रेल्वेमार्गाची प्रतीक्षा
मुरबाड,अहमदनगर अशा दोन रेल्वेमार्गाचे सांधत नकाशे तयार केले तसेच एक प्रस्ताव तयार केला. या प्रस्तावाला वाटेत येणार्या छोटे नद्या नाले त्यावर उभारावे लागणारे मोठे पूल. छोट्या मोरया, खडीसाठी उपलब्ध असणारे डोंगर वाटेतील टेकडी व ती टाळण्यासाठी घ्यावी लागणारी वळणे, प्रस्तावित रेल्वे मार्गाला कुठून पाणीपुरवठा होऊ शकतो, (मूळ प्रस्ताव कोळशाचे इंधन) नजरेसमोर ठेवून प्रस्ताव तयार केला होता. या पूर्ण रेल्वेमार्गावरील सरकारी व खासगी जमीन किती किती जमीन सरकारला संपादित करावी लागेल ती कोणत्या ग्रामपंचायतीच्या हद्दीत येते. वनविभागाची जमीन किती आहे अशा अनेक प्रकारच्या बारीक सारीक तपशिलाचा समावेश होता. लाल बहादूर शास्त्री रेल्वे मंत्री असताना मुकणे व कुवारी यांनी सर्वप्रथम रेल्वे मंत्र्यांना पाठविला होता. मुंबई – माळशेज – नगर रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष मधुकर वाल्हेकर कल्याण-अहमदनगर रेल्वे सुरू करण्याबाबत 3 डिसेंबर 2013 ला पत्र पाठवले होते. परंतु, खेदाची बाब म्हणजे ज्या नाना शंकर शेठ यांनी रेल्वेला मुहूर्त स्वरूप दिले त्या नानांच्या जन्मभूमी असलेल्या मुरबाड शहरात 165 वर्षांच्या कालावधीत नंतरही रेल्वे बासनात गुंडाळून ठेवण्यात आली आहे. आतापर्यंत रेल्वे मंत्री लालू प्रसाद यादव, ममता बॅनर्जी, राम नाईक, सुरेश कलमाडी, सुरेश प्रभू तर आताचे विद्यमान रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्या कार्यकाळात मुरबाड टिटवाळा रेल्वे धावू शकली नाही. त्यामुळे भारतीय रेल्वेचे जनक नाना शंकर शेठ यांनी रचलेल्या रेल्वेच्या पायाला कोण मजबूत करणार, याकडे तमाम मुरबाडकरांचे लक्ष लागले आहे.