नवी दिल्ली : सेवाज्येष्ठतेचा निकष डावलून भारताच्या लष्करप्रमुखपदी अनपेक्षितपणे झालेल्या लेफ्टनंट जनरल बिपीन रावत यांच्या नियुक्तीवरून राजकीय वाद सुरू झाला आहे. तीन वरिष्ठ अधिकार्यांना डावलून सरकारनं रावत यांचीच निवड का केली,’ असा सवाल काँग्रेसनं केला आहे. डाव्या पक्षांसह जेडूयूनेही सरकारच्या या निर्णयावर टीका केली आहे. लष्करप्रमुखपदी नियुक्ती करताना ज्येष्ठतेकडे दुर्लक्ष करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 1983 मध्ये लेफ्टनंट जनरल एस. के. सिन्हा यांच्याऐवजी जनरल ए. एस. वैद्य यांना प्राधान्य देत प्रमुखपदाची जबाबदारी सोपवली होती. तत्पूर्वी 1972 मध्ये इंदिरा गांधी सरकारनेच त्यावेळी लोकप्रिय असलेल्या लेफ्टनंट जनरल पी. एस. भगत यांच्याकडे दुर्लक्ष केले होते.यंदा लष्करप्रमुखांची नियुक्ती करताना संरक्षण मंत्रालयाने ज्येष्ठता हा निवडीचा आधार नसल्याचे वारंवार संकेत दिले होते. बिपिन रावत हे लेफ्टनंट जनरल बक्क्षी व दक्षिण कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल पी. एम. हॅरिस यांच्यापेक्षा कनिष्ठ आहेत. बिपिन रावत यांनी 1 सप्टेंबर रोजी व्हाईस चीफचा कार्यभार सांभाळला होता. त्यामुळे लष्कर प्रमुख पदाच्या शर्यतीत ते प्रबळ दावेदार मानले जात होते. उंचीवरील ठिकाणे व उग्रवादाशी सामना करण्याचा त्यांच्याकडे विशेष अनुभव आहे.
क्षमतेवर संशय नाही पण…
गत 33 वर्षांत प्रथमच सरकारने ही नियुक्ती करताना ज्येष्ठतेकडे दुर्लक्ष केल्याचे विरोधी पक्षाचे म्हणणे आहे. ही नियुक्ती करताना ज्येष्ठतेकडे सरकारने दुर्लक्ष का केले, असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते मनीष तिवारी यांनी केला आहे. लेफ्टनंट जनरल रावत यांच्या क्षमतेवर आमचा संशय नाही. परंतु सरकारने त्यांची नियुक्ती करताना तीन वरिष्ठ अधिकार्यांना का महत्व दिले नाही, याचे उत्तर दिले पाहिजे असे त्यांनी म्हटले आहे. संयुक्त जनता दलाचे नेते के. सी. त्यागी यांनीही अशा प्रकारची नियुक्ती करताना पारदर्शकतेची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. कम्युनिस्ट पक्षाचे डी. राजा यांनी लष्कराला एखाद्या वादात ओढणे ठीक नसल्याचे म्हणत सरकारने ज्येष्ठतेकडे दुर्लक्ष का केले याचे स्पष्टीकरण देण्याची मागणी केली. तर दुसरीकडे सैन्यदलातील माजी अधिकार्यांनी सेनाप्रमुखांच्या नियुक्ती प्रकरणात वाद निर्माण करणे योग्य नसल्याचे सांगत सरकारची बाजू घेतली. अशांत क्षेत्रात काम करण्याचा रावत यांच्याकडे मोठा अनुभव असल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले. गत तीन दशकांत त्यांनी भारतीय लष्करातील महत्वाच्या पदावर काम केलेले आहे. त्यांनी अनेक मोहिमांचे नेतृत्व केले आहे. पाकिस्तानची सीमा, चीनची सीमा आणि ईशान्य भारतात त्यांनी महत्वाची जबाबदारी सांभाळली आहे. लष्कराचे नेतृत्व, बचाव अभियान राबवणे आणि नागरी समूहात संवाद निर्माण करण्यासाठी त्यांना ओळखले जाते.