नशिराबाद : भरधाव चारचाकीने दुचाकीला दिलेल्या जबर धडकेत दुचाकीस्वार दोघे आरोग्यसेवक ठार झाले. हा अपघात राष्ट्रीय महामार्गावरील नशिराबाद गावाजवळील माऊली पेट्रोल पंपाजवळ बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडला. अपघात प्रकरणी नशिराबाद पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अपघातात दोघे जागीच ठार
राष्ट्रीय महामार्गावरील नशिराबाद गावाजवळील माऊली पेट्रोल पंपाजवळ बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास भरधाव चारचाकी (एम.एच.06 बी.ई. 1769) या वाहनाने दुचाकी क्रमांक (एम.एच.19 ए.एक्स.2460) ला उडविल्याने दुचाकीस्वार भूषण रमेश पाटील (42, रा.फैजपूर, ता.यावल) हे जागीच ठार झाले तर गंभीर जखमी झालेले संजय मधुकर भिरूड (45, रा.मस्कावद, ता.रावेर) यांना डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयात हलवण्यात आले मात्र रात्री उशिरा त्यांचीही प्राणज्योत मालवली. दरम्यान, मयत भूषण पाटील यांच्या पश्चात आई, आजी, पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा परीवार आहे.
नशिराबाद पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल
अपघाताची माहिती मिळाल्यानंतर नशिराबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघात प्रकरणी नशिराबाद पोलिसात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे काम गुरुवारी दुपारी सुरू होते. तपास सहा.पोलिस निरीक्षक अनिल मोरे व पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र साळुंखे करीत आहेत.