नशिराबाद अपघात : मृत चालकाविरुद्ध गुन्हा

0

भुसावळ- भरधाव चारचाकी समोरा-समोर धडकून झालेल्या भीषण अपघातात जळगाव येथील चौघांचा जागीच दुदैवीरीत्या मृत्यू झाल्याची घटना नशिराबाद गावाजवळील वळणावर गुरुवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास घडली होती. या चार दिवसानंतर अपघाताला कारणीभूत ठरणार्‍या जळगावच्या मृत चालकाविरुद्ध रविवारी नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी नशिराबादचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आर.टी.धारबडे यांच्या फिर्यादीनुसार मृत चालक समुद्रगुप्त उर्फ बंटी चंद्रगुप्त सुरवाडे (20, रा.गेंदालाल मिल, जळगाव) विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

समोरा-समोर धडकल्या भरधाव चारचाकी
नशिराबाद गावाच्या वळणावरील काझी पेट्रोल पंपाजवळ जळगावकडून भुसावळकडे जाणारी आयटेन कार (एम.एच.19 बी.यु.8710) व भुसावळकडून जळगावकडे जाणारी क्रेटा कार (एम.एच.19 सी.यु.6633) मध्ये समोरा-समोर धडक झाली होती तर अपघातात आयटेन कारमधील जळगावच्या गेंदालाल मिल परीसरातील रहिवासी असलेल्या समुद्रगुप्त उर्फ बंटी चंद्रगुप्त सुरवाडे (20, रा.गेंदालाल मिल, जळगाव), दीपक अशोक चव्हाण (22, गेंदालाल मिल, जळगाव), सुबोध मिलिंद नरवाडे (18, गेंदालाल मिल, जळगाव), रोहित जमदाडे (18, गेंदालाल मिल, जळगाव) यांचा जागीच मृत्यू झाला होता तर त्यांचे मित्र शुभम विजय इंधवे (20, गेंदालाल मिल, जळगाव) व सचिन अशोक तायडे (22, गेंदालाल मिल, जळगाव) हे जखमी झाले तसेच दुसर्‍या क्रेटा वाहनाचा चालक प्रीन्स मुन्नालाल अग्रवाल (33, सम्राट कॉलनी, जळगाव), चिरागअली विक्रम अली (19, सुप्रीम कॉलनी, जळगाव) व सोहेब शेख (30, सुप्रीम कॉलनी, जळगाव) हे जखमी झाले होते.