अनेकांच्या घरावरील पत्रे उडाली
नांदेड : नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुका व परिसरात आज सायंकाळी ४ च्या सुमारास वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट होऊन गारपिटीसह मुसळधार पाऊस पडला. पावसामुळे शहरातील नाल्याच्या रस्ते जलमय झाले असून, गेल्या अनेक दिवसापासून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना या गारव्याने मात्र दिलासा मिळाला आहे. तसेच टंचाईचा सामना करणाऱ्या नागरिकांना याचा काही अंशी दिलासा मिळणार असून यामुळे पुनर्भरण केलेल्या बोअरच्या पाणी पातळी वाढण्यास मदत होणार आहे. मुसळधार पावसामुळे सखल भागातील घरामध्ये पाणी शिरल्याने संबंधितांची एकच तारंबळ उडाली होती. तसेच अन्य परिसरातही जोरदार पाऊस झाला असून, यामुळे शेतातील वैरणासह अनेकांच्या आखाड्यावरील व घरावरील टिन- पत्रे उडून गेल्याने नुकसान झाले आहे.