नांदेड । नांदेड जिल्ह्यातील 452 गावांना नुकत्याच झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. तब्बल 29 हजार 635 हेक्टर क्षेत्रांतील पिके बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे. चार ते पाच दिवसांत पंचनामे पूर्ण झाल्यानंतर नुकसानीची अंतिम आकडेवारी प्राप्त होणार आहे. नांदेड़ जिल्ह्यातील तालुक्यांत गारपीट झाली. वादळीवा-यासह अवकाळी पाऊसही झाला. या पावसाने एक जण जखमी झाला आहे. गारपिटीचा सर्वाधिक फटका हदगाव तालुक्याला बसला असून तालुक्यात 7 हजार 743 हेक्टर क्षेत्रातील पिके बाधित झाली. यामध्ये जिरायत क्षेत्र 7 हजार 469 हेक्टर, बागायत 250 आणि 24 हेक्टरवरील फळपिकांचे नुकसान झाले आहे. त्याखालोखाल किनवट तालुक्यात 2 हजार 945 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. नांदेड तालुक्यात 2 हजार 739 क्षेत्रातील जिरायत, बागायत व फळपिके बाधित झाली आहेत.
तालुकानिहाय बाधित गावे
धर्माबाद तालुक्यात 2 हजार 405 हेक्टर क्षेत्रातील पिके गारपिटीने बाधित झाली. बिलोली तालुक्यात 2 हजार 196, नायगाव तालुक्यात 1 हजार 899, लोहा तालुक्यात 1 हजार 692, माहूर तालुक्यात 2 हजार 223 हेक्टर, हिमायतनगर तालुक्यात 1 हजार 131 हेक्टर आणि कंधार तालुक्यात 165 हेक्टर क्षेत्रात शेतीचे नुकसान झाले आहे. नांदेड तालुक्यात 18, धर्माबाद तालुक्यात 56, नायगाव तालुक्यातील 23, बिलोली तालुक्यातील 12, कंधार तालुक्यातील 34, हदगाव तालुक्यातील 44, हिमायतनगर तालुक्यातील 4, किनवट तालुक्यातील 95 आणि माहूर तालुक्यातील 166 गावांना गारपिटीचा फटका बसला आहे. जिल्ह्यात गारपीट आणि विजा पडून 13 मोठी जनावरे आणि 9 लहान जनावरे दगावली आहेत. जिल्ह्यात 24 हजार 935 हेक्टर क्षेत्रातील जिरायत पिकांना गारपिटीचा फटका बसला.