नाकात कॅमेरा घालून काढली फुप्फुसातली पिन

0

नवी दिल्ली । वाचायला किंवा ऐकायला काहीशी विचीत्र वाटणारी पण, वास्तवात अवघड असलेली गुंतागुंतीची एक शस्त्रक्रिया दिल्लीच्या डॉक्टरांनी नुकतीच यशस्वी केली. ही शस्त्रक्रिया एका 13 वर्षीय मुलीवर करण्यात आली. ही मुलगी अफगाणिस्तानातील असून, बुरखा घालताना तोंडात धरलेली पिन मुलीकडून चुकून गिळली गेली. ही पिन मुलीच्या अन्ननलिकेत अडकली होती. पालकांनी अफगाणिस्तानच्या डॉक्टरांकडे उपचार करून पाहिले. मात्र, यश न आल्याने त्यांनी थेट दिल्ली गाठली. अत्यंत अनुभवी असलेल्या दिल्लीच्या डॉक्टरांनी ही शस्त्रक्रिया लिलया यशस्वी केली. ही शस्त्रक्रिया यशस्वी करण्यासाठी मुलीच्या नाकावाटे एक सूक्ष्म कॅमेरा फुप्फुसात सोडण्यात आला होता.

पीडित मुलीवर उपचार करणारे डॉक्टर अरुणकुमार गिरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, फुप्फुसात अडकलेली पिन काढण्यासाठी सुमारे एक तास लागला. मुलीच्या छातीत फुप्फुसात डाव्या बाजूच्या धमणीत ही पिन जाऊन अडकली होती. त्यामुळे फुप्फुसात रक्तस्त्राव सुरू झाला होता. त्यामुळे आम्ही रूग्णाच्या (मुलीच्या) नाकातून एक कॅमेरा आत सोडला. कॅमेर्‍याच्या मदतीने एका विशिष्ट अवजाराने पिन बाहेर काढली. शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर मुलीच्या वडिलांनी डॉक्टरांचे आभार मानले.

याबाबत एका डॉक्टरांनी सांगितले की, लहानमुलांच्या बाबतीत असे अनेक प्रसंग घडत असतात. अशा केसेस अनेकदा आमच्याकडे येत असतात. लहान मुलांना हातातील वस्तूचे गांभीर्य नसते. त्यामुळे ते कोणतीही वस्तू तोंडात घालतात. अनेकदा या वस्तू नाणी, छोट्या गोट्या किंवा असेच काहीतरी असते. या वस्तू शक्यतो मुलांच्या पोटात जातात. पण, या वस्तू जर टोकदार असतील म्हणून तातडीचे उपाय योजायला हवेत.