नागपूरमधील मोर्चामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्र

0

पुणे । शेतकर्‍यांच्या प्रश्‍नासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नागपूर विधानभवनावर येत्या 12 तारखेला मोर्चा नेण्यात येणार असून त्याकरीता पुण्यातून दोन्ही पक्षांचे शेकडो कार्यकर्ते जाणार आहेत. दोन्ही पक्षांच्या कार्यालयात मोर्चाच्या तयारीची लगबग सध्या चालू आहे. या मोर्चामुळे दोन्ही पक्ष एकत्र येत असल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात बदल घडतील असा अंदाज राजकीय विश्‍लेषकांनी व्यक्त केला आहे.

काँग्रेसकडून दहा लक्झरी गाड्यांची व्यवस्था
काँग्रेस पक्षातही असंख्य कार्यकर्ते मोर्चात सामील होण्यासाठी इच्छुक आहेत, असे पक्षाचे प्रवक्ते रमेश अय्यर यांनी सांगितले. काँग्रेस पक्षाने कार्यकर्ते नेण्यासाठी दहा लक्झरी गाड्यांची व्यवस्था करण्याचे ठरविले आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनीही मोर्चाच्या तयारीत लक्ष घातले आहे.

गेल्या तीन महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तीन मोर्चे पुण्यात काढले. या तीनही मोर्चाचे नेतृत्व अजित पवार यांनी केले. त्यामुळे पक्ष संघटनेत आपोआप बांधणी झाली आहे. शिवाय महिला विभागानेही आंदोलने केली होती, याचा परिणाम म्हणून नागपूर मोर्चासाठी प्रतिसाद वाढत आहे. याखेरीज पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा 12 तारखेला वाढदिवस आहे, यादिवशी निघणारा मोर्चा यशस्वी व्हावा, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे.

हल्लाबोल आंदोलनाला कसे सामोरे जातात?
या मोर्चामुळे दोन्ही पक्ष एकत्र येत असल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात बदल घडतील असा अंदाज राजकीय विश्‍लेषकांनी व्यक्त केला आहे. मोर्चाला सामोरे जाण्यासाठी भाजपची वरिष्ठ पातळीवर तयारी चालू आहे. यशवंत सिन्हा यांच्या आंदोलनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समर्थपणे तोंड दिले, विरोधकांच्या हल्लाबोल आंदोलनाला ते कसे सामोरे जातात, याकडेही लक्ष आहे.

नागपूरला जाण्यासाठी जणू स्पर्धाच…
काँग्रेस पक्षात 11 तारखेला राहुल गांधी अध्यक्षपदाची सूत्रे घेणार आहेत, या मोर्चापुढे त्यांचे भाषण होण्याची शक्यता आहे. कार्यकर्त्यांना त्याची उत्सुकता अधिक आहे. राहुल गांधी यांना देशभरात पाठिबा वाढत असल्याने पक्षात जोश आहे. या कारणाने नागपूरला जाण्यासाठी काँग्रेसजनात जणू स्पर्धा लागली आहे.

राष्ट्रवादीकडून सोळा बोगीची रेल्वे बुक
पुणे शहर, पुणे जिल्हा आणि पिंपरी-चिंचवडमधील कार्यकर्ते रेल्वेने नागपूरला जाणार असून याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सोळा बोगी असलेली रेल्वे बुक केली आहे. ही गाडी 11 तारखेला पुण्यातून नागपूरकडे रवाना होणार आहे. अनेक कार्यकर्त्यांनी मोर्चात सहभागी होण्याची इच्छा दर्शविली आहे, असे पक्षाच्या अध्यक्षा खासदार वंदना चव्हाण यांनी सांगितले.