नागपूर विधानभवनासह परिसरावर ड्रोनची नजर

0

नागपूर – तब्बल ४० वर्षांनंतर नागपुरात उद्यापासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शहर पोलीस आणि अधिकाऱ्यासोबत पोलीस कर्मचारी तैनात राहणार आहेत. त्यासोबत विधानमंडळासह सर्व संवेदनशील परिसरात बसवण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे आणि त्याच्या जोडीला ड्रोनही आपली नजर ठेवणार आहे.

पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात राज्यभरातून आलेल्या सात पोलीस उपायुक्त, 15 सहायक पोलीस आयुक्त, 50 पोलीस निरीक्षक, सहा महिला पोलीस निरीक्षक , 200 सहायक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक, 1700 पोलीस कर्मचारी, 250 महिला पोलिसांशिवाय राज्य राखीव पोलीस दलाच्या सात कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. या दरम्यान कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी दोन दिवसांपूर्वी पोलिसांना खास असे कार्यक्रम आखून देण्यात आले आहेत.

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सुमारे 20 हून अधिक विविध संघटनांचे मोर्चे आंदोलने होणार असल्याने हे आंदोलने- मोर्चे शांततेत पार पाडावे यासाठी आजपासूनच मोर्चा स्थळांवर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आले आहेत. ठिकठिकाणी पोलिसांनी त्यासाठी ब्यरेक लावले आहेत. तर मोर्चास्थळी साध्या गणवेशातील पोलीस आणि गुप्तचर यंत्रणेचे अधिकारीही तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय सीसीटीव्ही व हेल्मेट कॅमेऱ्याद्वारेही मोर्चातील प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवण्यात येणार आहे.

विधानभवासह सर्वच संवेदनशील ठिकाणांवर ड्रोन व सीसीटीव्हीद्वारे पोलिस नजर रोखणार असून रामगिरी, रविभवन व आमदार निवास परिसरातही कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विधानपरिषद आणि विधानसभा या दोन्ही सभागृहाच्या विरोधीपक्ष नेत्यांसोबत कॅबिनेट आणि राज्यमंत्री यांना भेटण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची ओळख पाहिली जाणार आहे. त्यासोबतच गुन्हेगारी अभिलेख आहे किंवा नाही याचीही पडताळणी पोलिसांकडून करण्यात येणार आहे.