नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला विरोध: आसाम, त्रिपुरामध्ये जाळपोळ !

0

दिसपूर, गुवाहाटी: पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातून भारतात आलेल्या बिगर मुस्लिम निर्वासितांना भारतीय नागरिकत्व बहाल करणारे नागरिकत्व सुधारणा दुरुस्ती विधेयक काल सोमवारी मध्यरात्री लोकसभेमध्ये मोठ्या बहुमताने पारित झाले. या विधेयकाच्या समर्थनात ३११ तर विरोधात केवळ ८० मते पडली. या विधेयकाला विरोध देखील होत आहे. दरम्यान आसाम, त्रिपुरामध्ये या विधेयकाला तीव्र विरोध होत आहे. विविध संघटनांनी राज्यात बंद पुकारला आहे. अनेक ठिकाणी हिंसक आंदोलन आणि जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. आगरताळा येथे नागरिक रस्त्यावर उतरले. निषेधार्थ घोषणाबाजी झाल्या.

बंदचा प्रभाव सकाळपासूनच दिसून येत आहे. राज्यात दुकाने सकाळापासूनच बंद आहेत. काही ठिकाणी आंदोलक रस्त्यावर उतरले असून, जाळपोळीसारख्या घटना घडल्या आहेत.

पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातून भारतात आलेल्या बिगर मुस्लिम निर्वासितांना भारतीय नागरिकत्व बहाल करणारे नागरिकत्व सुधारणा विधेयक गृहमंत्री अमित शाह लोकसभेत मांडले होते. नागरिकत्व कायदा दुरुस्ती विधेयक 311 विरुद्ध 80 अशा फरकाने मंजूर झाले. लोकसभेत विधेयक मंजूर झाले असले तरी आता मोदी सरकारची राज्यसभेत खरी अग्निपरीक्षा असणार आहे. उद्या बुधवारी हे विधेयक राज्यसभेत मांडले जाणार आहे. केंद्र सरकारने या विधेयकाला राज्यसभेत सादर करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. यासाठी सत्ताधारी भाजपाने 10 आणि 11 डिसेंबरला आपल्या राज्यसभेतील खासदारांना व्हिप जारी केला आहे. दरम्यान, नागरिकत्व सुधारणा विधेयक आज राज्यसभेत मतदानासाठी सादर करण्यात येईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.