धुळे । राज्यातील शैक्षणिक संस्था शाळांच्या आवारात तंबाखूसह तंबाखूजन्य पदार्थांच्या वापरास शासनाने निर्बंध घातले असून यासाठी शालेय शिक्षण विभागाने परिपत्रक देखिल काढले आहे. तंबाकू मुक्त अभियानात नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन चिरणे जिल्हा परिषद शाळेचे केंद्र प्रमुख वसंत पाटील यांनी केले. शिंदखेडा तालुक्यातील हातनूर जिल्हा परिषद शाळेत भारत सरकार नेहरू युवा केंद्र धुळे व लोकशक्ती विकास संस्था हातनूर यांच्या संयुक्त विद्यमाने जि.प.शाळेत तंबाकू मुक्त अभियान राबविण्यात आले. यावेळी किशोर निकम, संस्थचे अध्यक्ष चंद्रकांत सोनार, श्रीराम बोरसे, संतोष निकम, प्रेमराज निकम, कोमल पाटील, तुषार पाटील, देवेन्द्र पाटील आदी उपस्थितीत होते.
शाळेच्या 100 मीटर परिघात बंदी
केंद्रप्रमुख पाटील म्हणाले की, शासनाने तंबाकू मुक्त होण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी प्रवेशव्दार, प्रत्येक मजल्यांवरील जिना तसेच लिफ्टच्या प्रवेशद्वारावर लाल रंगात ‘धूम्रपान निषद्धि क्षेत्र’ लिहिलेला लोगो बंधनकारक केला आहे. तसेच शाळांच्या प्रवेशद्वारापासून 100 मीटरच्या परिघात तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस बंदी घालण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच तंबाखू नियंत्रण कायद्यानुसार शैक्षणिक संस्थांसह सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानास बंदी असल्याचे वसंत पाटील यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषद शाळेच्या फलकावर अमली पदार्थ विक्री तसेच दंड बाबत सूचना लावण्यात आली आहे. शासनाचा निर्णय स्वागतार्ह असल्याचे मान्यवरांनी सांगितले.