तळोदा। शहरातील कचरा डेपो चिनोदा रस्त्यालगत लागून आहे. तसेच तो नागरी वस्तीलाही लागून आहे. त्यामुळे परिसरात पसरलेल्या घाणीमुळे दुर्गंधी पसरली आहे. त्याचा परिणाम होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यासाठी नगर पालिका प्रशासनाने त्यावर उपाय करणे गरजेचे झाले आहे. यापूर्वी कचरा डेपो गावाच्या बाहेर होता. परंतु वाढत्या शहरीकरणामुळे डेपोजवळ अनेक वसाहती निर्माण झाल्याने कचरा डेपो नागरी वस्तीत आला आहे. कचरा डेपोत मोठमोठे डोंगर उभे झाले आहे. येथे सतत आग लागून धूर होतो. हवेमुळे धुर आणि त्याची दुर्गंधी आजूबाजूच्या वसाहतीमध्ये पसरते. कचरा कुजून त्याची असह्य दुर्गंधी पसरत आहे. डेपो शेजारील वसाहतीत राहणारे आणि चिनोदा रोड, बायपासवरून येणार्या-जाणार्या नागरिकांसाठी कचरा डेपो धोकेदायक ठरत आहे. कचरा डेपो हा रहिवासी वस्तीत नियमबाह्य आहे. त्यामुळे नियम धाब्यावर बसविले जात असल्याचे सद्यस्थितीला चित्र आहे.
कचरा डेपो दुसर्या ठिकाणी हलविण्याची मागणी
बायपास रस्त्यावर विविध व्यापारी प्रतिष्ठान सुरू झाले आहे. हा भाग तळोद्याचा सर्वात जास्त गजबजलेला आणि मार्केटचे भाग आहे. पालिकेने लवकरात लवकर कचरा डेपो दुसर्या ठिकाणी हलविण्याची मागणी वसाहतील नागरिक करू लागले आहेत. याठिकाणी व्यापरी संकुल उभारून पालिकेच्या उत्पन्नात मोठी वाढ होऊन तळोद्याच्या विकासात हातभार लागणार आहे. कचरा डेपोत घन कचरा अंतर्गत गांडूळ खत प्रकल्प राबविला गेला होता.परंतु तोही धूळ खात पडला आहे. त्याकडेही कुणीही लक्ष देण्यास तयार नाहीत. तीन कोटींच्या जवळपास खर्चून कचर्यावर प्रक्रिया करणारे विविध प्रकल्प उभारल्यावरही नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न सुटलेला नाही.
डेपोतील कचरा डुकरांमुळे रस्त्यावर पसरला आहे. तेथे येणार्या जाणार्यांना डुकरामुळे दूचाकी स्वार खाली पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. रस्त्यालगत पडलेला कचरा येथे कोंबडीची पिसे आणि मास पसरले आहे. त्यामुळे त्याचाही घाण वास येतो. तसेच तेथे कुत्री व डुकरे नेहमी गर्दी करतात. या रस्त्यावरून हजारो लोक ये-जा करत असतात. त्यात सत्ताधारींसह विरोधी पक्षातील नगरसेवकही ये-जा करतात. परंतु कोणीही यासंदर्भात आवाज उठवायला तयार नसल्याचा सूर नागरिकांमधून निघत आहे.