नागरिकाच्या सतर्कतेने वाचले हरणाचे पाडस

0

कुसुंबा परीसरात सापडले कुत्र्यांच्या तावडीत

जळगाव । तालुक्यातील उजाड कुसूंबा परिसरात कुत्र्यांच्या तावडीतून सुटण्यासाठी धावत असलेल्या हरीणाच्या पाडसाचा जीव एका जागरूक नागरिकामुळे वाचला आहे. दरम्यान, पोलिसांनी पिल्लू ताब्यात घेवून वन परिक्षेत्र अधिकार्‍यांच्या स्वाधीन केले आहे. सुप्रीम कॉलनीत परिसरात राहणारे रविंद्र लक्ष्मण सोनवणे हे सोमवारी रात्री 8.30 च्या सुमारास म्हशींसाठी चारा घेवून उजाड कुसूंबा परिसरातून घराकडे पायी परतत होते. यावेळी रस्त्यावर 8 ते 10 कुत्रे मागे लागलेले असल्याने एक हरणाचे पिल्लू धावत असल्याचे त्यांनी पाहिले.

जीव वाचवून केला चारा-पाणी
रविंद्र सोनवणे यांनी धाव घेत हरणाच्या पाडसाची कुत्र्यांच्या तावडीतून सुटका केली. कुत्र्यांना हाकलून ते पाडसाला स्वतःच्या घरी घेवून आले. घराजवळ बांधून त्यांनी त्याला चारा-पाणी दिले. त्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या कर्मचार्यांना त्यांनी याबाबत फोनव्दारे माहिती दिली.

पाडसे पोलीसांच्या ताब्यात
एमआयडीसी पोलीस ठाण्याचे कर्मचारी रामकृष्ण पाटील, मनोज सुरवाडे, किशोर पाटील, विजय पाटील, अतुल पाटील यांनी त्याठिकाणी धाव घेतली. हरणाचे पाडसं ताब्यात घेवून परिसरात त्याच्या आईचा त्यांनी शोध घेतला परंतु कोणतेही हरीण दिसून आले नाही. त्यामुळे पाडसाला वनपरिक्षेत्र अधिकार्यांच्या ताब्यात देण्यात आले.