ठाणे । शहरामध्ये सध्यस्थितीत 5903 हेक्टर जमीन विकासासाठी उपलब्ध आहे. त्यापैकी नागरी पुनरूत्थान योजनेतंर्गत एकूण 1291 हेक्टर जमीनीमध्ये क्लस्टरची योजना राबविण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. ठाणे शहराच्या नागरी पुनरूत्थान योजनेमुळे ठाणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात सुविधा निर्माण होण्याबरोबरच मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. ठाण्याची वाटचाल सुनियोजित शहराकडे होणार असल्याने क्लस्टरमुळे शहराचा चेहरा-मोहरा बदलण्यास मदत होणार असल्याचे मत ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या निवासस्थानी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत या योजनेचे सादरीकरण करण्यात आले. या योजनेमुळे ठाणे शहराच्या विकासाला प्राधान्य देण्याची आवश्यकता असून शहराच्या विकासासाठी कसलीही तडजोड न करण्याच्या सूचना शिदे यांनी यावेळी महापालिका आयुक्तांना दिल्या. या बैठकीला शहर व विकास नियोजन अधिकारी, क्रीसीलचे सल्लागार, शहर नियोजन तज्ज्ञ संजय देशमुख आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
ठाणे शहराच्या एकूण तुलनेत 22 टक्के इतकी जमीन क्लस्टर अंतर्गत विकसित करण्यात येणार असून यामुळे शहरामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक सुविधा निर्माण होणार आहेत. यामध्ये क्रीडा, सांस्कृतिक, सुरक्षितता, दळणवळण, प्रत्येक समाजाची केंद्रे, महिला बचत गटांसाटी स्वतंत्र जागा त्याचप्रमाणे समाजाच्या सर्व दैनंदिन गरजा पुरविणारे कम्युनिटी सेंटर आदी विपुल प्रमाणात सुविधा निर्माण होणार आहेत. दरम्यान, या सुनियोजित पुनरूत्थान योजनेमुळे एकूण मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामध्ये जेवढी रोजगाराची संधी उपलब्ध आहेत त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त रोजगार शहरात निर्माण होणार आहे.
मुंबईच्या तुलनेत ठाणे शहरात रोजगाराची संधी जास्त
आजमितीस मुंबईमध्ये 69 टक्के, नवी मुंबईमध्ये 18 टक्के, मिरा, भायंदर, वसई विरार येथे 4 टक्के, भिवंडी, अंबरनाथ येथे 5 टक्के तर ठाणे शहरामध्ये केवळ 4 टक्के रोजगाराची संधी उपलब्ध आहे. तथापि क्लस्टर योजनेमुळे मुंबई सोडून उर्वरित एमएमआर क्षेत्रात 51 टक्के रोजगाराची संधी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे या योजनेमुळे 23 हजार अतिरिक्त घरे निर्माण होणार असून परवडणार्या घरांच्या प्रमाणातही वाढ होणार आहे. त्यामुळे या शहरातील नागरिकांचे राहणीमान उंचावण्यास मदत होणार आहे.