नागरी सुविधांची आरक्षणे लवकरच घेणार ताब्यात

0

पुणे । शहराच्या मध्यवर्ती भागातील विकास आराखड्यात प्रस्तावित करण्यात आलेली मैदाने, शाळा, उद्याने तसेच इतर नागरी सुविधांची आरक्षणे अद्यापही पालिकेने ताब्यात घेतलेली नाहीत. त्यामुळे या भागातील नागरिकांना अद्यापही या सुविधांचा लाभ मिळत नाही. या जागा ताब्यात घेण्यासाठी लवकरात लवकर उपाय योजना करण्याचे आश्‍वासन महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी नुकतेच दिले.

प्रभाग क्रमांक 17 मधील नागरीसमस्या तसेच रखडलेल्या कामांची पाहाणी महापालिका आयुक्त कुमार यांनी नुकतीच केली. शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनवडे यांच्या मागणीनुसार, ही पाहणी करण्यात आली. त्यावेळी तातडीने रखडलेली कामे पूर्ण करण्याचे आश्‍वासनही आयुक्त कुमार यांनी दिल्याचे धनवडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. आयुक्तांच्या या भेटीत दूध भट्टी, फिश मार्केटचे प्रकल्प पूर्ण करण्याचे आदेश आयुक्तंनी दिले आहेत. सुलोचना कोंढरे, सुनिता गायकवाड, पालिकेचे अधिकारी उपस्थित होते. प्रभाग क्रमांक 17 मधील रास्तापेठ, रविवार पेठ, बुधवार पेठ, नाना, गणेश आणि शुक्रवार हा मध्यवस्तीचा भाग येतो. या भागात नागरिकांसाठी उद्यान नाही. मुलासाठी खेळाचे मैदान नाही. पार्किंगची व्यवस्था नाही.

शहराच्या जुन्या हददीच्या डिपीमधील आरक्षणाच्या जागा आजही ताब्यात घेण्याची प्रक्रिया करण्यात आलेली नाही. त्यामुळे या जागा आता तरी ताब्यात घ्याव्यात, अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनवडे यांनी केली. दूध भट्टी आणि फिश मार्केटचे दोन प्रकल्प गेल्या वर्षभरापासून प्रलंबित आहेत. त्यासाठी प्रत्येकी दीड कोटीचा निधी उपलब्ध करून दिला आहे याकडेही धनवडे यांनी लक्ष वेधले.