नागादेवी पाझर तलावाला भगदाड ः नदी काठावरील ग्रामस्थांचे स्थलांतर

0

प्रशासनाने नदीच्या विरूद्ध दिशेन पाटचारी करून पाणी वळवल्यानेि दलासा

यावल- तालुक्यातील सौखेडासीम गावाजवळील नागादेवी पाझर तलावाला मोठे भगदाड पडल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे थरकाप उडाला तर नदीकाठावरील शेकडो ग्रामस्थांनी सतर्कता बाळगत नातेवाईकांसह मंदिरात आश्रय घेतला आहे. गतवर्षीच सुमारे एक कोटी रुपये खर्चून तलावाची दुरुस्ती करण्यात आली मात्र निकृष्ट कामामुळे या तलावाला गळती लागल्याची चर्चा आहे. दरम्यान, प्रशासनाने सतर्कता दाखवत तलावाला लागलेल्या गळतीनंतर गावाकडे येत असलेले पाणी नदीच्या विरूद्ध दिशेन काढल्याने ग्रामस्थांना काही अंशी दिलासा मिळाला आहे.

ग्रामस्थांचा थरकाप, प्रशासनाची धाव
शुक्रवारी दुपारनंतर तलावास मोठे भगदाड पडल्याने व पाण्याची मोठ्या प्रमाणावर गळती सुरू झाल्याने तलाव कोणत्याही क्षणी फुटेल या भीतीने ग्रामस्थांचा थरकाप उडाला आहे. याबाबतची माहिती कळताच प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांनी येथील आदिवासी दिन कार्यक्रमातून थेट यंत्रणेसह धरण गाठले. प्रशासनाने परीसरातील गावांना सर्तकतेचा इशारा दिला असून गतवर्षीय एक कोटी खर्चून काम झाल्याने ठेकेदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सौखेडासीम येथील भोनक नदीवरील पाझर तलाव 2006 मधील अतीवृष्टीत फुटला होता. गत वर्षी अर्थात तब्बल 12 वर्षानंतर या तलावाची एक कोटी रुपये खर्च करून दुरूस्ती करण्यात आली मात्र दोन दिवसात झालेल्या पावसाने 354.28 टीएमसी क्षमतेच्या तलावाला गळती लागल्याने खळबळ उडाली.

जुन्या आठवणी ताज्या
2006 च्या अतिवृष्टीत हा तलाव फुटल्याने तालुक्यातील सौखेडा, साकळी, शिरसाड येथील गावांमध्ये पाणी शिरले होते. त्यानंतर गेली 12 वर्षे हा तलाव तसाच पडून होता. परीसरातील ग्रामस्थांनी दुरूस्तीसाठी अनेक वेळा आंदोलने, निर्दशने केली त्यानंतर गतवर्षी सुमारे चार दिवस चालेल्या ग्रामस्थांच्या उपोषणांनतर शासनाने दखल घेत यासाठी 94.35 लाख मंजूर केल्यांनंतर गेल्या वर्षी जुनमध्ये काम पूर्ण करण्यात आले. असे असलेतरी गतवर्षी अल्प स्वरूपाचा पाऊस झाल्याने हा तलाव भरला नाही मात्र यंदाच्या पावसाळ्यात व सलग दोन दिवस सुरू असलेल्या संततधार पावसाने हा तलाव 70 टक्के भरला. शेतकरी आनंदात असतानाच शुक्रवारी तलावास गळती लागली.

गळतीनंतर प्रशासन, लोकप्रतिनिधींची धाव
दहिगावचे सरंपच देविदास पाटील, जि.प. सदस्य रवींद्र पाटील, पंचायत समिती सदस्य शेखर पाटील, पंचायत समिती सदस्य दीपक पाटील, वसंत पाटील, लहू पाटील, साकीरा तडवी, सुनील बडगुजर, पोलिस पाटील पंकज बडगुजर यांनी धाव घेत प्रशासनाला कळवले. प्रांताधिकारी डॉ.अजीत थोरबोले, तहसीलदार जितेंद्र कुंवर, रवीकांत सोनवणे, गटविकास अधिकारी किशोर सपकाळे, जि.प. अभियंता श्रीपाद नाईक, जाधव, प्रशांत अराक यांनी धाव घेतली. घटनास्थळी जेसीबी बोलावल्यानंतर नदीपात्राच्या विरूध्द बाजुने पाणी सोडण्यासाठी खोदकाम करून पाणी बाहेर काढण्यात आले. दरम्यान, सुरक्षात्मक उपायय योजनेंतर्गत परीसरातील काही घरांना स्थलांतरीत करण्यात आले असून नागादेवी वस्ती, सौखेडासीम, साकळी, नावरे, शिरसाड या गावातील नदीकाठावरील ग्रामस्थांना दवंडीव्दारे अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.