नागोडी नदीच्या पुरात शेतमजूराचा मृतदेह आढळला

0

नैसर्गिक आपत्ती प्रमाणे मदत मिळावी ; रावेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद

रावेर- शनिवारी नागोडी नदीच्या पुरात वाहून बेपत्ता झालेल्या अजनाड येथील शेतमजूर तरूणाचा मृतदेह सोमवारी सकाळी नागोरी नदीच्या बंधार्‍यात आढळला. याबाबत रावेर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दीपक रामकृष्ण पाटील (वय 39) यांनी घरी जाण्यापूर्वी 29 रोजी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास आपल्या पत्नीला मी चोरवड येथे आलेलो आहे असा भ्रमणध्वनी केला होता. ते सकाळपर्यंत घरी पोहोचलेच नाही. अखेर रविवारी सकाळी त्यांच्या पत्नीने रावेर पोलीस ठाण्यात येऊन हरवल्याची नोंद केली होती.

बंधार्‍यात आढळला मृतदेह
दरम्यान, चोरवड जवळील नदीला आलेल्या पुरात ते वाहून गेल्याची भीती व्यक्त होत होती. दरम्यान पोलीस प्रशासन व ग्रामस्थांचे त्यादृष्टीनेही शोध मोहीम कार्य सुरू असताना आज सकाळी नऊ वाजता दीपकचा मृतदेेेह जवळच असलेल्या बंधार्‍यात काट्यांमध्ये अडकलेला आढळून आला. रावेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. दरम्यान, दीपक पाटील हा शेत मजुरी करून कुटुंबाचा उदर निर्वाह करीत होता. त्याच्या पश्‍चात पत्नी, एक मुलगा,एक मुलगी ,आई असा परिवार आहे. त्याच्या अकाली मृत्यूमुळे कुटुंबावर डोंगर कोसळले आहे. त्यांच्या परीवारास नैसर्गिक आपत्तीतून आर्थिक मदत करावी अशी मागणी आहे. तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल श्रीराम वानखेडे, बिजू जावरे तपास करीत आहेत. घटनास्थळी पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे आणि सहाय्यक निरीक्षक शिवाजी पाळदे यांनी भेट दिली.