नाट्यगृहेही होणार दररोज स्वच्छ

0

पुणे । महाराज शहरातील बालगंधर्व रंगमंदिरासह सर्व सहा नाट्यगृहे आणि सांस्कृतिक भवन येथे स्वच्छताविषयक कामे करण्यासाठी दरमहा सर्वसाधारणपणे 1 लाख 20 हजार रुपये खर्च होणार असून त्यासंदर्भात महापालिका प्रशासनाने ठेवलेल्या प्रस्तावाला बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

सहा नाट्यगृहे आणि सांस्कृतिक भवन
महापालिकेतर्फे शहरात सहा नाट्यगृहे आणि सांस्कृतिक भवने चालवली जातात. या नाट्यगृहांच्या परिसरात अत्यंत अस्वच्छता असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात होत्या. काही दिवसांपूर्वी मराठी अभिनेत्री मुक्ता बर्वे यांनी कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामधील स्वच्छतागृहांच्या दुरवस्थेची छायाचित्रे थेट सोशल मीडियावर अपलोड करत महापालिका प्रशासनाला जाब विचारला होता. त्यावर महापालिकेने तातडीने हे स्वच्छतागृह साफ केले होते. मात्र, त्यामुळे महापालिकेच्या सर्वच नाट्यगृहे आणि सांस्कृतिक भवनातील स्वच्छतेचा मुद्दा ऐरणीवर आला होता.

सर्वांत कमी दराच्या निविदेचा विचार
त्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व नाट्यगृहे चकाचक करण्याच्या कामासंदर्भात महापालिकेने निविदा काढल्या होत्या. बालगंधर्व रंगमंदिर येथील स्वच्छताविषयक कामासाठी चार कंपन्यांच्या निविदा आल्या होत्या. त्यापैकी सर्वांत कमी दराच्या निविदेच्या मान्यतेची शिफारस न करता प्रशासनाने सर्वाधिक दराची निविदा सादर करणार्या कंपनीला काम देण्याची तयारी दर्शवली. त्यावर स्थायी समितीतील अविनाश बागवे, दिलीप बराटे आणि नाना भानगिरे यांनी आक्षेप नोंदविला. त्यावर प्रशासनाला समाधानकारक उत्तरे देता आली नाही. मात्र, किमान वेतन कायद्याचे निकष पाळून निविदा भरणार्या ठेकेदारालाच हे काम देण्यात आल्याचे प्रशासनाने नमूद केले. समितीने या प्रस्तावाला मंजुरी दिली.

मूल दत्तक घेणार्‍या महिलांना विशेष रजा
मूल दत्तक घेणार्या महापालिकेच्या महिला कर्मचार्यांना शासनाच्या धोरणान्वये तीन महिने ते 1 वर्षापर्यंत विशेष रजा देण्यासंदर्भातील प्रस्तावाला स्थायी समितीने बुधवारी मंजुरी दिली. दत्तक मूल घेणार्या कर्मचार्यांना विशेष रजा मंजूर करण्याचा निर्णय शासनाने 10 मार्च रोजी घेतला होता. या प्रस्तावानुसार, मूल दत्तक घेण्याच्या तारखेस मुलाचे वय 1 महिन्याच्या आत असल्यास एक वर्षे, तर सहा महिन्यांपेक्षा जास्त व सात महिन्यांच्या आत असल्यास 180 दिवसांची रजा मिळणार आहे, तर मुलाचे वय 1 वर्षांपेक्षा अधिक आणि तीन वर्षापेक्षा कमी असल्यास ही रजा 90 दिवसांची राहिल.