नाट्यसंमेलनाध्यक्षांसह आखणी दोन जण रिंगणात
कार्यकारिणीच्या 19 जागांसाठी निवडणूक जाहीर
पुणे : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुणे शाखेच्या पंचवार्षिक निवडणुकीला रंग चढण्यास सुरुवात झाली आहे. यंदाची निवडणूक तीन पॅनेलमध्ये रंगणार आहे. नाट्य परिषद पुणे शाखेच्या विद्यमान कार्यकारिणीतील उपाध्यक्ष आणि नाट्यसंमेलनाध्यक्ष कीर्ती शिलेदार, अविनाश देशमुख आणि सदस्य विजय वांकर हे निवडणूक रिंगणात उभे राहण्याची शक्यता आहे. शाखा अध्यक्ष सुरेश देशमुख यांच्यासह डॉ. सतीश देसाई आणि प्रदीपकुमार कांबळे हे माजी अध्यक्ष अशी तीन स्वतंत्र पॅनेल निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. आजमितीला 45 उमेदवारी अर्जांची विक्री झाली आहे.
नाट्य परिषद पुणे शाखेच्या कार्यकारिणीच्या 19 जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली असून मंगळवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला. मेघराज राजेभोसले व दीपक रेगे देशमुख यांच्या पॅनेलमध्ये आहेत. नाट्यअभिनेत्री भाग्यश्री देसाई आणि निकिता मोघे यांचा डॉ. सतीश देसाई यांच्या पॅनेलमध्ये समावेश आहे. प्रदीकुमार कांबळे यांनी आपल्या पॅनेलमध्ये नाट्य व्यवस्थापकांना संधी दिली आहे. उमेदवारांची संख्या अधिक वाढल्यानंतर मोठ्या आकाराची मतपत्रिका छापण्याची वेळ निवडणूक यंत्रणेवर येणार आहे.
इच्छुक उमेदवारांना गुरुवारी (दि.27) अर्ज दाखल करता येणार आहेत. उमेदवारांच्या अर्जांची छाननी होऊन शनिवारी (दि.29) निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे. परिषदेचे दीड हजार आजीव सभासद मतदार आहेत. टिळक स्मारक मंदिर येथील नाट्य परिषद कार्यालयामध्ये 7 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. त्याच दिवशी सायंकाळी मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर सर्वाधिक मते संपादन करणार्या 19 उमेदवारांना विजयी घोषित करण्यात येईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी शिरीषकुमार जानोरकर यांनी दिली.
कार्यकारिणी सदस्यपदासाठी निवडणूक रिंगणात उभे राहणार्या उमेदवाराकडून दीड हजार रुपये अनामत रक्कम नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेनेच निश्चित केली आहे. त्या अनामत रकमेच्या माध्यमातून नाट्य परिषदेच्या कोशात भर पडणार आहे. 50 उमेदवार रिंगणात राहिले तरी पुणे शाखेच्या कोशामध्ये 75 हजार रुपयांची भर पडणार असल्याचे जानोरकर यांनी सांगितले.