नाट्य परिषद मंडळावर महाजन यांची निवड

0

पुणे । अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळासाठी राज्यभर निवडणूक होत असताना पुणे विभागाची निवडणूक बिनविरोध पार पडली. कोथरूड नाट्य परिषदेचे अध्यक्ष सुनील महाजन यांची नियामक मंडळाच्या सदस्यपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल कलासंस्कृती परिवारातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, वैैभव जोशी, अभिनेते माधव अभ्यंकर, महामंडळाच्या संचालिका निकिता मोघे उपस्थित होते. पुणे विभागातील 22 पैकी तब्बल 15 उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने सात जणांची परिषदेच्या नियामक मंडळावर थेट वर्णी लागली. त्यामध्ये सुनील महाजन, योगेश सोमण, दीपक रेगे, भाऊसाहेब भोईर, राज काझी, दीपक काळे आणि सुरेश धोत्रे यांचा समावेश आहे. पुणे विभागाची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सूतोवाच महाजन व सोमण यांनी केले होते. पुणे शाखा त्याला प्रतिसाद देणार का, असा प्रश्‍न उपस्थित झाला होता. मात्र पुणे शाखेचे अध्यक्ष देशमुख यांनी अर्ज मागे घेऊन बिनविरोधला सकारात्मक प्रतिसाद दिला. नाट्य परिषदेच्या निवडणुकीला राजकीय रंग न देता, एकमेकांवर चिखलफेक न करता रंगभूमीसाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावे, अशी इच्छा महाजन यांनी व्यक्त केली होती.