बोदवड- तालुक्यातील नाडगाव येथील राममंदिराजवळ राहणार्या मुलाला पाहण्यासाठी गेलेल्या तुळसाबाई भगवान सरोदे (65) या वृद्धेचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. शुक्रवारी रात्री ही घटना घडली. या प्रकरणी बोदवड पोलिसात सोमेश्वर प्रभाकर पाचपांडे (41) यांच्या खबरीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
मुलाला पाहणे बेतले जीवावर
तुळसाबाई सरोदे यांचा मुलगा किशोर भगवान सरोदे (40) व त्याची पत्नी भारती या गच्चीवर चढल्यानंतर त्यांना इलेक्ट्रीक शॉक लागल्याने ते फेकले गेले. ही घटना कळाल्यानंतर आपला मुलगा किशोरसह सुनेस काय झाले हे पाहण्यासाठी तुळसाबाई मुलाच्या घरी गेल्या मात्र लोखंडी जीन्याजवळ गेल्यानंतर त्यांना जीन्यातील वीज प्रवाहाचा स्पर्श झाल्याने त्या खाली कोसळल्या. यावेळी किशोर यांचा मुलगा अनिकेत व मुलगी प्रक्षल यांना सुद्धा विजेचा शॉक लागल्याने ते फेकले गेले. या घटनेनंतर गावकर्यांनी गावाच्या डीपीवरून विजेचा प्रवाह बंद केला. तुळसाबाई व मुलगा किशोर यांना बोदवड ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्यानंतर अधीपरीचारिका एस.व्ही.घोगे यांनी तुळसाबाई भगवान सरोदे यांना मयत घोषित केले. किशोर भगवान सरोदे यास अधिक उपचारासाठी जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले. दरम्यान, शनिवारी सकाळी 11 वाजता तुळसाबाई यांच्यावर शोकाकुल वातावरणात नाडगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.