नाडगावात सिलिंडरने पेट घेतल्याने लाखोंचे नुकसान

0

सुदैवाने जिवीतहानी टळली : गॅस गळतीमुळे दुर्घटना

बोदवड : तालुक्यातील नाडगाव येथे सिलिंडरने अचानक पेट घेतल्याने आग लागल्याने लाखोंचे नुकसान झाले. ही घटना शनिवार, 9 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास गावातील जिजाऊ नगरातील रहिवासी साहेबराव गडाख (53) यांच्या घरात घडली. सिलिंडर लिकेज झाल्याने गॅस गळली झाल्याने आग लागल्याचे सांगण्यात आले. आगीमुळे घरातील संसारोपयोगी वस्तु जळून खाक झाल्या तर या घटनेत गडख यांच्या पत्नी शोभाबाई गडाख (44) यांच्या पायाला किरकोळ दुखापत झाली तर सुदैवाने कुठलीही जीवीतहानी झाली नाही. स्वयंपाक सुरू असतांना सिलेंडरने अचानक पेट घेतला. पत्नीने या घटनेनंतर आरडाओरड करताच पती साहेबराव गडाख घरात पळत आले. पत्नीच्या अंगावरचे जळणारे कपडे पाहताच त्यांनी ाणी टाकुन आग विझविली. याप्रसंगी पत्निला घराबाहेर सुखरुप काढल्यानंतर शेजार्‍यांना आवाज देण्यात आला. शेजारी धनराज गायकवाड यांच्या घरातील बोअरवेलची मोटार सुरू केल्यानंतर नळीद्वारे संपूर्ण घरात पाणी शिंपडुन आग आटोक्यात आणण्यात आली. यावेळी गावातील बाबुराव शिंदे यांनी हिंमत करत आगीच्या तांडवात पेटलेल्या सिलिंडरवर ओले पोते टाकले. या प्रसंगात स्वयंपाक घरात असलेले फ्रिज, मिक्सर व इतर जीवनाश्यक वस्तु जळुन खाक झाल्या. या आगीत सुमारे दोन लाखापर्यंत नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. महिलेच्या पायाला आगीची झळ लागल्याने पायाला किरकोळ दुखापत झाल्याने बोदवड ग्रामीण रुग्णालयात औषधोपचार करण्यात आले. पोलिस स्टेशन व तलाठी यांनी आगीचा पंचनामा केला.