महिला लिपिकावरील चाकूहल्ला प्रकरण ; जवाबानंतर कळणार हल्ल्याचे कारण
बोदवड- तालुक्यातील नाडगाव येथील शासकीय आयटीआयमधील शिक्षकाने आपल्याच सहकारी महिला लिपिकावर जीवघेणा चाकू हल्ला केल्याची घटना बुधवारी सकाळी साडेनऊ ते दहा वाजेच्या सुमारास घडली होती. या घटनेनंतर जिल्हाभरात खळबळ उडाली होती. या प्रकरणी दुसर्या दिवशी गुरुवारी बोदवड पोलिस ठाण्यात जखमी महिला लिपिकाच्या पतीने दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी तथा शिल्प निदेशक कपूरचंद एकनाथ पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, चाकू हल्ल्याच्या कारणामागे प्रेमसंबंध असल्याची दबक्या आवाजात चर्चा असलीतरी जखमी महिला लिपिकाच्या जवाबानंतर खरे कारण स्पष्ट होणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
महिलेच्या पतीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल
बुधवारी सकाळी साडेनऊ ते दहा वाजेच्या दरम्यान लिपिक रूममध्ये असलेल्या महिला लिपिक चंदा गरकल यांच्यावर शिल्प निदेशक कपूरचंद एकनाथ पाटील (50, मूळ रा.धुळे, ह.मु.नाडगाव) यांनी चाकू हल्ला केला. गरकल यांच्या गालासह हातावर, पोटावर गळ्यावर धारदार चाकूने वार झाल्याने त्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या तर या हल्ल्यानंतर शिक्षक व आरोपी असलेल्या कपूरचंद यांनीही स्वतःच्या पोटावर चाकूने हल्ला चढवत आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना घडली त्यावेळी लिपिक रूमचा दरवाजा आतून बंद असल्याने चंदा गरकल यांनी केलेल्या आरडाओरड नंतर विद्यार्थ्यांनी दरवाजा तोडला होता. विद्यार्थी व सुरक्षा रक्षकाने दोन्ही जखमींना तातडीने बोदवड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलवल्यानंतर प्रथमोपचार करून दोघांना जळगावला हलवण्यात आले आहे. हल्ल्याच्या दुसर्या दिवशी गुरुवारी बोदवड पोलिस ठाण्यात जखमी चंदा गरकल यांचे पती उमेश विठ्ठलराव गरकल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी कपूरचंद एकनाथ पाटील यांच्याविरुद्ध बोदवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी कपूरचंद पाटील हे आपल्या पत्नीशी सलगी करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे व त्यांच्याविरुद्ध वरीष्ठ स्तरावर तक्रार केल्याने त्यांनी हल्ला केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
जवाबानंतर कळणार कारण
दरम्यान, चाकू हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी हल्ल्यातील चाकू जप्त केला असून आरोपी कपूरचंद पाटील यांचा जबाब नोंदवला आहे. चंदा गरकल व आपण एकाच ठिकाणी शासकीय नोकरीस असून महिला लिपिकावर स्वतः चाकू हल्ला केल्याची त्यांनी कबुली दिली आहे तर गरकल यांची प्रकृती धोक्याबाहेर असलीतरी त्या अद्याप शुद्धीवर आला नसल्याने त्यांचा जवाब नोंदवल्यानंतर हल्ल्याची नेमके कारण कळू शकेल, असे पोलि सूत्रांनी सांगितले. तपास पोलिस निरीक्षक सुनील खरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दीपक ढोमणे करीत आहेत.