नाडगाव येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रावर लॉकडाऊनची वेळ

0

दोषींवर कारवाईची शिवसेना नाडगावतर्फे कारवाईची मागणी

बोदवड : कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी अत्यावश्यक तातडीच्या सेवा पुरविणार्‍या आरोग्य कर्मचार्‍यांना निवासस्थानी राहून आरोग्य सेवा देण्याच्या सुचना केल्या होत्या परंतु नाडगाव येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र कित्येक दिवसांपासून बंदावस्थेत आहे. उपकेंद्राचा निवासी चार्ज ज्या कर्मचार्‍या कडे आहे हा कर्मचारी येथे आजपर्यंत उपस्थित राहिल्याचे कोणालाही दिसले नाही. यासंदर्भात शिवसेना नाडगाव कडून सदरील प्रकाराचा पाठपुरावा करण्यात आला तसेच वैद्यकीय अधिकारी, ग्राम कोरोना जनजागृती समितीचे अध्यक्ष सरपंच, सचिव पोलीस पाटील, सदस्य तलाठी यांना तक्रार अर्ज काल देण्यात आला तसेच तात्काळ उपकेंद्राला भेट देऊन पंचनामा करण्याची लेखी मागणी करण्यात आली. या पार्श्वभूमीवर आमदार चंद्रकांत पाटील यांना संपर्क करीत सदरील प्रकार कळविला. या पार्श्वभूमिवर पोलीस पाटील,तलाठी व वैद्यकीय अधिकारी यांनी सदरील स्थळाला भेट दिली. परिणामी , उपकेंद्र बंद अवस्थेत दिसुन आले.

कर्मचार्‍याकडून शासनाची दिशाभूल
3 रोजी सकाळी 11.30 च्या सुमारास प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कपिल पवार , तलाठी कल्पना पागृत , पोलीस पाटील प्रियंका पाटील , नांदगाव पोलीस पाटील नितिन गोरे यांनी उपकेंद्राला भेट दिली व सदरील प्रकाराचा आढावा घेतला. या दरम्यान आरोग्य उपकेंद्रात सर्दी, ताप, खोकला यासंदर्भात औषधसाठा नसल्याचे आरोग्य सेविका यांनी सांगितले होते पण औषधींचा साठा असल्याचे पाहणीत उघडकीस आले. संबंधित कर्मचारी आमच्याकडून पैसे घेत असल्याची तोंडी तक्रार यासंदर्भात समितीच्या सर्व पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत वैद्यकीय अधिकार्‍यांना एका ग्रामस्थ तक्रारदाराकडून सांगण्यात आली. उपकेंद्राच्या भेटीदरम्यान निवासी चार्ज असलेल्या कर्मचार्‍याच्या निवासी खोलीत भांडे, स्वयंपाक करण्यायोग्य सामान अंथरुण तसेच राहण्यायोग्य वस्तू आढळल्या नाही त्यामुळे साधारणत: तीन वर्षापासून निवासी चार्ज असलेला कर्मचारी तालुका आरोग्य अधिकारी मनोज चौधरी यांच्या दुर्लक्षाममुळे शासनाची दिशाभूल करत असल्याचे उघडकीस झाले. या प्रसंगी तालुका वैद्यकीय अधिकारी व आरोग्य अधिकार्यांकडून संबंधित कर्मचार्‍याला नोटीस बजावण्यात आली व पुढील कार्यवाहीसाठी जिल्हा आरोग्य अधिकायांना अहवाल पाठविण्यात आलाय.
प्राथमिक आरोग्य उपकेंद्र नाडगावच्या अधिकार क्षेत्रात नाडगाव, नांदगाव, कोल्हाडी, आमदगांव, जुनोना व इतर गावे येतात. त्यामुळे गेल्या 3 वर्षापासून हि गावे आरोग्य सेवेपासून वंचित आहे. त्यामूळे दोषी असणार्या निवासी चार्ज असलेल्या कर्मचार्‍यावर जिल्हाधिकारी ,मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांनी निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना नाडगाव तर्फे करण्यात येत आहे.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी तक्रारदार भगवान पाटील, संजय सोनवणे, अर्जुन आसणे, अमोल व्यवहारे, दिपक पवार यांच्यासहित सरपंच पती अजय गवळे, आमदगांव ग्रामपंचायतीच्या वतीने सदस्य सचिन पाटील , दिलीप पौळ, तुषार घुले, आकाश कदम, विनोद रूपचंदानी उपस्थित होते.