नाणारमध्ये उद्धव ठाकरेंच्या सभेवर बहिष्कार

0

सत्तेत राहून विरोधी सूर आळवणार्‍या सेनेला स्थानिकांची चपराक

मुंबई : नाणार रिफायनरीबाबत उध्दव ठाकरे यांची नाणारमध्ये आज सोमवारी सभा होणार असून या सभेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय रिफायनरीविरोधी संघटनांनी घेतला आहे. आधी प्रकल्प भूसंपादनाची अधिसूचना रद्द करा आणि मगच गावात सभा घ्या असा पवित्रा या प्रकल्पग्रस्तांनी घेतल्याने ठाकरेंची नाणारमध्ये सभा होणार की नाही यावर प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहे. शिवसेना सत्तेची मलई चाखत दूसरीकडे भाजपविरूद्ध बोटे मोडत असली तरी नाणारमधील स्थानिकांनी हा प्रकार ओळखला आहे. त्यामुळेच आधी भूसंपादनाची अधिसूचना रद्द करा मगच बोला, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

हा सरकारचा फूट पाडण्याचा प्रयत्न
संघटनेचे अध्यक्ष अशोक वालम यानी प्रकल्पग्रस्तांच्या बैठका घेऊन हा निर्णय जाहीर केला आहे. नाणार संबंधी अधिसूचना करणाताना नागरिकांना विश्‍वासात घेतले नाही, त्यांच्या मतांचा विचार केला नाही त्यामुळे शिवसेनेने जरी नाणार विरोधात आंदोलन केली असली तरी कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे असे स्थानिकांचे म्हणणे आहे. शिवसेनेच्याच मतदार संघात सभा यशस्वी करण्याचा आव्हान शिवसेनेसमोर असणार आहे. तर दुसरीकडे शिवसेना नेत्यांनी कोणत्याही परिस्थितीत ही सभा यशस्वी झाली पाहिजे असे आदेश स्थानिक पदाधिकार्‍यांना दिले आहेत. खासदार विनायक राउत यांनी म्हटले आहे की ही बातमी खोटी असून सरकार फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. एकी फोडण्याचा सरकारमधील काही व्यक्तींचा डाव असल्याचाही आरोप केला आहे.