नाणार राहणार अन् प्रकल्प जाणार!

0

मुंबई । नाणार हे नाणारच राहील, इथे रिफायनरी प्रकल्प होणार नाही. तो नागपुरात घेऊन जा किंवा गुजरातला घेऊन जा, पण महाराष्ट्राच्या पवित्र भूमीत तो होऊ देणार नाही, अशा स्पष्ट शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाणारबाबत आपली भूमिका जाहीर केली. केवळ नाणारच नव्हे तर जैतापूरही गुजरातला घेऊन जा. आम्ही देशभक्त आहोत, शिवरायांचे भक्त आहोत, भूमिपुत्रांना उद्ध्वस्त करणारे प्रकल्प येथे होऊ देणार नाही. सगळे विकले जाऊ शकतात. परंतु, शिवरायांचा मावळा कधीही विकला जाऊ शकत नाही. तुमच्या विचारांनी आमचे रक्त नासू देणार नाही, असे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुनावले. नाणारवासीयांना दिलासा देण्यासाठी सोमवारी प्रत्यक्ष भेट देऊन त्यांनी शेतकर्‍यांना दिलासा दिला.

नाणारची अधिसूचना रद्द : अर्धा पैसा सौदी अरेबियांच्या खिशात आणि अर्धा पैसा जाणार मोदींच्या खिशात, आम्हाला काय मेंढरं समजता? कोकणी माणूस कुठे जाणार? सरकारने जर वरवंटा फिरून मोजणी करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना अडवा, शिवसेना तुमच्या पाठीशी राहील, असे ते शेतकर्‍यांना म्हणाले. एक इंचही जमीन यापुढे गुजरात्यांच्या घशात घालणार नाही, अशी शपथही त्यांनी शेतकर्‍यांकडून घेतली. नाणार प्रकल्पासंदर्भातील भूसंपादनाची अधिसूचना रद्द करत असल्याची घोषणा राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केली आहे. नाणार प्रकल्पावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले आहे.

मुख्यमंत्र्यांनी धमक्या देऊ नयेत. हा प्रकल्प गुजरातला गेला किंवा अन्य राज्यात तरी तो देशातच असेल, गुजरात काय पाकिस्तानमध्ये नाही, असा टोला शरद पवार यांनी लगावला.

मुख्यमंत्र्यांना दिल्लीत कवडीची किंमत नाही
दिल्लीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या शब्दाला कवडीची किंमत नाही. आम्हाला शब्द दिला, नाणारच्या जनतेचा विश्‍वास जिंकल्याशिवाय पुढे पाऊल टाकणार नाही, असे सांगणार्‍या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शब्द मोडून सौदीअरेबियाच्या कंपन्यांशी करार होतोच कसा? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.

अधिसूचना रद्द केलेली नाही
नाणार प्रकल्पासाठी भूमिसंपादन करण्याची अधिसूचना रद्द करणे हे शिवसेना आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई यांचे व्यक्तिगत मत आहे. त्यांना कोणताही अधिकार नाही, नाणार प्रकल्पाची अधिसूचना रद्द करण्यात आलेली नाही.’
-देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री.