विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सूचक वक्तव्य
निलेश झालटे,नागपूर: कोकणातील नाणार प्रकल्पावरून सध्या राजकीय वातावरण तापले असताना नाणार सोबत दुसरी रिफायनरी विदर्भात आणण्याबाबत सूचक वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी करून खळबळ उडवून दिली आहे. भाजपचे आमदार आशिष देशमुख यांनी रिफायनरीबाबत मुद्दा उपस्थित केला होता. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्टीकरण दिले. मात्र यावेळी शिवसेना सदस्य मात्र मूग गिळून गप्प बसल्याचे चित्र होते.
हे देखील वाचा
‘नाणार’वरून पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यातील तीन दिवस गोंधळ झाला असताना आता अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशीही ‘नाणार’चा विषय ऐरणीवर आला.शुक्रवारी नेहमीच चर्चेत असणारे आणि नाणारची रिफायनरी विदर्भात आणण्याची भूमिका वेळोवेळी मांडणारे भाजपाचे आमदार आशिष देशमुख यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे रिफायनरीचा प्रश्न उपस्थित केला. त्यांनी यावेळी सांगितले कि, आपल्या राज्यात रिफायनरीमुळे तब्बल तीन लाख कोटींची गुंतवणूक होणार असून पन्नास हजार लोकांना प्रत्यक्ष तर एक लाख लोकांना अप्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे. परंतु ‘नाणार’ येथील स्थानिकांना जर हा रिफायनरी प्रकल्प नको असेल तर मुख्यमंत्र्यांनी हा प्रकल्प विदर्भात आणावा, अशी मागणी देशमुख यांनी केली. तसेच भारतात 9, अमेरिकेत 68, चीनमध्ये 19 व रशियात 20 ठिकाणी रिफायनरी समुद्रापासून दूर अंतरावर आहेत. त्यामुळे ‘नाणार’ रिफायनरी विदर्भात आणायला काय हरकत आहे, असा सवाल उपस्थित केला. रिफायनरी प्रकल्प विदर्भात आणण्यासाठी देवेंद्रजींनी धर्मेंद्रजी आणि नरेंद्रजींकडे आपली ताकद खर्च करावी, अशी शाब्दिक कोटी करत त्यांनी आपली मागणी समोर ठेवली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर बोलताना सांगितले कि, तुम्ही म्हणताय ते सत्य असून विदर्भाला एवढया मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या प्रकल्पाची गरज आहे. त्यामुळे मी पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे विदर्भात जमिनीवरील रिफायनरी आणण्यासाठी प्रयत्न करेन, असे सांगितले. यावर राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित करत, तुम्ही ‘नाणार’ची रिफायनरी विदर्भात आणायचे म्हणताय का नवीन रिफायनरी विदर्भात आणणार ते स्पष्ट होत नाही, असे सांगितले. यावर भुजबळ तुम्हाला माहीत आहे, मला काय म्हणायचे आहे ते, कुठला प्रश्न कधी विचारायचा हेही तुम्हाला नेमके कळते, तुम्ही या सभागृहातील सर्वांत हुशार सदस्य आहात, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्याचबरोबर यावर बोलताना विदर्भात जर रिफायनरी आणायची असेल तर ती जमिनीवरीलच आणावी लागेल आणि ‘नाणार’ येथील करार हा किनारी रिफायनरीसाठी झाला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. नाणार येथे होऊ घातलेला प्रकल्प तसाच ठेऊन मुख्यमंत्र्यांनी विदर्भात दुसरी रिफायनरी आणण्याचे याद्वारे सूचित केले आहे.