आईसह पत्नीला व्हिसा देणार पाकिस्तान
नवी दिल्ली : हेरगिरीच्या आरोपावरून पाकिस्तानच्या कारागृहात डांबण्यात आलेले भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना भेटण्यासाठी त्यांच्या आई व पत्नीस व्हिसा देण्याचा निर्णय पाकिस्तान सरकारने घेतला आहे. या दोघीही येत्या 25 डिसेंबरला नाताळ सणाच्या दिवशी त्यांना भेटू शकणार आहेत. या दोघांच्या सुरक्षेची पाकिस्तान सरकारने खात्री द्यावी, अशी मागणी भारताच्यावतीने परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांनी केली आहे. त्याबाबत पाकिस्तानने अद्याप काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
जाधव कुटुंबीयांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह!
पाकिस्तानच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते मोहम्मद फैसल यांनी या भेटीची माहिती दिली. भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना गेल्यावर्षी ईराण आणि पाकिस्तानच्या सीमेवर पाकिस्तानी पोलिसांनी अटक केली होती. या भेटीच्या वेळी भारतीय दूतावासाचे अधिकारीही उपस्थित असतील, असे फैजल यांनी सांगितले. जाधव यांना हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानी लष्कराने बलुचिस्तानातून अटक केल्याचा दावा पाकिस्तानने केलेला आहे. पाक लष्करी न्यायालयाने त्यांना देशात अशांतता पसरविणे व हेरगिरी केल्या आरोपावरून फाशीची शिक्षा ठोठावलेली आहे. तथापि, भारताने या शिक्षेविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतल्यानंतर या न्यायालयाने या शिक्षेस स्थगिती दिलेली आहे. मानवाधिकाराचा हवाला देत, भारताने जाधव यांना त्यांच्या कुटुंबीयांना भेटू द्यावे, असा आग्रह धरला होता. त्यानुसार, जाधव यांच्या आई व पत्नीस त्यांना भेटू देण्याबाबत व्हिसा देण्यात आलेला आहे, पाकिस्तानचा हा निर्णय भारतासही कळविण्यात आलेला आहे, अशी माहिती पाकिस्तानच्यावतीने देण्यात आली. या भेटीदरम्यान भारतीय उच्चायुक्तालयातील अधिकारीही उपस्थित राहू शकतो, असे भारताने नमूद केले. तसेच, जाधव यांच्या कुटुंबीयांना पाकिस्तानने सुरक्षा प्रदान केली असल्याचे सांगण्यात येत असले तरी त्याबाबत अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नव्हती. कुलभूषण यांच्या आई आणि पत्नी पाकिस्तानात असताना त्यांना कोणताही त्रास दिला जाणार नाही, त्यांची कोणतीही चौकशी केली जाणार नाही, अशी हमी भारताने पाकिस्तानकडे मागितली होती.
म्हणणे मांडण्यासाठी पाकला 13 डिसेंबरपर्यंत वेळ
आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण जाधवप्रकरणी लेखी स्वरुपात म्हणणे मांडण्यासाठी 13 डिसेंबरपर्यंतचा वेळ दिला असून, त्यानंतरच या प्रकरणाची पुढील सुनावणी घेतली जाणार आहे. तर जाधव यांनी पाकिस्तानात दहशतवादी कारवाया घडवून आणल्या होत्या, यावर आम्ही ठाम राहणार असल्याचे पाकिस्तानी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने सांगितले आहे. तर भारताने पाकिस्तानचे आरोप फेटाळून लावले असून, ज्येष्ठ विधिज्ज्ञ हरिष साळवे हे याप्रश्नी भारताची बाजू मांडत आहेत. यापूर्वी त्यांनीच जोरदार युक्तिवाद करून जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेस स्थगिती आणली होती.