नाथाभाऊंना स्वपक्षीयांकडून न्याय नाही मात्र काम अव्याहतपणे सुरूच -खासदार रक्षा खडसे

0

मुक्ताईनगर- प्रत्येकाच्या मनात भाऊ आहेत अन् प्रेमाखातर शुभेच्छा देण्यासाठी प्रत्येक जण येथे आले आहेत. राजकारणात माझी सुरुवात भाऊ अर्थात माझे सासरे व माझे बाबा नाथाभाऊंंमुळेच झाली. त्यांनी मला कधी सुनेसारखे नाही तर मुलीसारखेच नेहमीच प्रेम दिले. जनसंपर्क वाढवला पाहिजे, लोकांच्या समस्या आपण जाणून घेतल्या पाहिजे ही शिकवण त्यांचीच असल्याने आपण गेल्या साडेचार वर्षात एक हजार 250 गावांचा दौरा करू शकलो, असे खासदार रक्षा खडसे म्हणाल्या. नाथाभाऊंनी गेल्या 30 वर्षात जे काम केले ते केवळ निवडणुकीपुरता केले नाही तर निवडणुकीनंतरही त्यांनी विरोधकांना सोबत घेत काम केले. भाऊंना न्याय मिळालेला नाही, हे जरी खरे असलेतरी त्यांचे काम अव्यातहपणे सुरूच आहे. पद महत्वाचे नसून जनसेवा महत्वाची आहे. स्व.निखीलकडून त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करीत आहोत. ते स्वप्न पूर्ण करण्याचा आपला प्रयत्न असणार असल्याचे सांगत असतानाच खडसे यांना गहिवरून आले.