विश्लेषण : एकनाथराव खडसेंनी दिलेल्या विकासाच्या ग्वाहीवर मतदारांचा ठेवला विश्वास
गणेश वाघ
भुसावळ- नोटबंदीसह जीएसटी, इंधन दरवाढ, वाढती महागाई यासह विविध विषयांवर भाजपा सरकारविरोधी केंद्रासह राज्यात विरोधी वातावरण असतानाच माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या मुक्ताईनगरात प्रथमच झालेल्या नगरपंचायतीच्या निवडणुकीत खडसे यांच्या नेतृत्वावर मतदारांनी विश्वास ठेवत भाजपाला एकहाती सत्ता दिली. गेल्या दोन वर्षांपासून मंत्री पदाबाहेर असलेल्या खडसे यांच्यासाठी खरे तर ही प्रतिष्ठेची निवडणूक ठरली होती मात्र सामाजिक गणितांची यशस्वी ठरलेली रणनीती, विकासकामे करण्याची धमक व ग्रामपंचायतीचे नगरपरीषदेत करण्यात आलेले रूपांतर आदी मुद्दे मतदारांना भावल्याने त्यांनी ‘भाजपाला एकहाती’ सत्ता दिली. शिवसेनेला अवघ्या तीन जागांवर समाधान मानावे लागले तर अपक्ष उमेदवाराला मात्र खाते उघडण्यात यश आले. काँग्रेस, भारीप उमेदवारांचा मात्र दारुण पराभव झाला.
विकास हाच ठरला कळीचा मुद्दा
मुक्ताईनगर शहराचा खुंटलेला विकास, पिण्याच्या पाण्याची समस्या तसेच रस्त्यांची दुरवस्था तसेच केंद्र व राज्यातील भाजपा विरोधी वातावरण हे विरोधी पक्षांनी प्रचारात मुद्दे तापवले असलेतरी माजी मंत्री खडसे यांनी विरोधकांवर टिका करण्याऐवजी केवळ मुक्ताईनगर शहर विकासाच्या मुद्द्यावर खर्या अर्थाने निवडणूक लढवली. खडसे यांच्या प्रयत्नाने ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपरीषदेत करण्यात आल्याने आगामी काळात शहरात विकासात्मक कामे होतील ही बाब मतदारांना भावली तर खडसे यांनी आपले वजन वापरून शहराच्या विकासाठी 90 कोटींचा निधीदेखील आणला. खडसेंमध्येच विकासकामे करण्याची धमक आहे शिवाय राज्यासह केंद्रात भाजपा सरकार असल्याने निधींसाठी अडचण येणार नाही ही बाब मतदारांना पटवून देण्यात आल्याने ही बाब भाजपा उमेदवारांच्या पथ्यावर ठरली. शासनाकडून आलेल्या निधीनंतर अनेक कामांच्या वर्क ऑडर्स निघाल्याने ही बाब जमेची ठरली.
संघटनात्मक बांधणी ठरली यशस्वी
मुक्ताईनगर नगरपंचायतीसाठी प्रथमच झालेल्या निवडणुकीत भाजपाने सर्व 17 जागांवर उमेदवार दिले. त्यातही जे उमेदवार दिले ते शिक्षीत व स्वच्छ चेहर्याचे असल्याने मतदारांना ही बाब भावली. शिवाय मुक्ताईनगरात आजही खडसेंवर प्रेम करणारा मोठा वर्ग असल्याचे दिसून आले. प्रत्येक प्रभागात उमेदवार देताना तेथील सामाजिक गणितांची चाचपणी करून त्या पद्धत्तीने खडसे यांनी उमेदवार दिले शिवाय कार्यकर्त्यांची यशस्वी संघटनात्मक बांधणी करून त्यांना जवाबदार्या सोपवण्यात आल्या शिवाय ईतरावर टिका-टिप्पणी करण्याऐवजी ‘शहराचा विकास हाच ध्यास’ हा मुद्दा मतदारांना पटवून देण्यात खडसे यशस्वी ठरले.
राष्ट्रवादी-सेना व काँग्रेसने स्वतंत्र उमेदवार दिल्याने फटका
मुक्ताईनगरच्या निवडणुकीत भाजपाने नजमा तडवी यांनी उमेदवारी दिली तर राष्ट्रवादी-शिवसेनेने आघाडी करीत ज्योत्स्ना दिलीप तायडे तसेच काँग्रेसनेही माधुरी आत्माराम जाधव यांना उमेदवारी दिली. भाजपा वगळता तीनही पक्षांनी जर युती ठेवून एक उमेदवार दिला असता तर कदाचित सामाजिक मतांचे धुव्रीकरण होवून तडवी नजमा यांचा प्रभाव कमी झाला असता मात्र ऐनवेळी काँग्रेसनेही स्वतंत्र उमेदवार दिल्याने भाजपा उमेदवाराला त्याचा फायदा झाला. काँग्रेससह भारीपाला मतदारांनी नाकारल्याने त्यांना खातेही उघडता आले नाही.
नाथाभाऊ किंगमेकरच
विविध आरोपांमुळे गेल्या दोन वर्षांपासून मंत्री पदापासून पाय-उतार असलेल्या खडसे यांच्या मुक्ताईनगरातील निकालाकडे राज्यातील राजकारण्यांच्या नजरा खिळल्या होत्या. खडसे यांची एकहाती सत्ता आल्याने खडसे मात्र मंत्री पदावर असो वा नसो ते किंगमेकर ठरले असून आजही जनतेचे वैयक्तिक खडसे यांच्या नेतृत्वावरच प्रेम असल्याचे पुन्हा एकवेळ सिद्ध झाले आहे. मुक्ताईनगरातील भाजपाच्या विजयामुळे खडसे समर्थकांचा उत्साह मात्र आणखी दुणावला आहे हेदेखील तितकेच खरे !