नानासाहेबांच्या समाधी स्थळाची दुरवस्था

0

पुणे । डेक्कन परिसरात मुठा नदीपात्रात श्रीमंत बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे यांची समाधी बांधण्यात आली आहे. मात्र, पालिकेचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. या परिसरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले असून स्थळाची दुरवस्था झाली आहे. एवढेच नाही तर हे स्थळ सध्या दारुड्यांचा अड्डा बनले आहे.

येथे मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे. याचाच फायदा घेत रात्रीच्या वेळी अनेक दारूडे दारू पिण्यासाठी या स्थळाचा वापर करतात. दारूच्या बाटल्या आणि सिगारेटची पाकीटे जागोजागी विखुरलेली आढळतात. याशिवाय परिसरात असेलेल्या म्हशींच्या गोठ्यामुळे आणि समाधीजवळून मोकाट फिरणार्‍या म्हशींमुळे समाधीची दुरवस्था झाली आहे. या सर्व परिसरात म्हशींच्या शेणाची प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. आपल्या अल्पशा कारकिर्दीत मराठ्यांच्या झेंडा अटकेपार नेणार्‍या या योद्ध्याचे वयाच्या 41 व्या वर्षी पर्वती येथे निधन झाले. त्या पराक्रमी योध्याच्या समाधीची दुरवस्था पाहून नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.