मुंबई । नायर रुग्णालयात 28 जानेवारी रोजी एमआरआय मशीन दुर्घटनेत राजेश मारू या व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या दुर्घटनेमुळे ही एमआरआय मशीन तेव्हापासून बंद पडली असून, त्यामुळे रुग्णांना या मशीनचा लाभ मिळत नाही. आता या मशीनच्या दुरुस्तीसाठी आता 1.53 कोटी रुपये खर्च येणार आहे. यासंदर्भातील, प्रस्ताव स्थायी समितीच्या आगामी बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे. महापालिकेने मे. फिलिप्स इं. लि. या कंपनीकडून ही एमआरआय मशीन 3 वर्षांच्या हमी कालावधीसह व 5 वर्षांच्या परिरक्षण कालावधीसह 2008 ला प्राप्त मंजुरीनुसार 7 कोटी 89 लाख 28 हजार 813 रुपयांना खरेदी केली होती.
21 जानेवारी 2017 रोजी या मशीनचा एकूण 8 वर्षांचा कालावधी संपला होता. त्यानंतर रुग्णसेवेकरता वाढीव एक वर्षाचा परिरक्षण करार फिलिप्स कंपनीसोबत करण्यात आला होता.आणखी पुढील 10 वर्षांसाठी परिरक्षण करार करण्यापूर्वीच 28 जानेवारी रोजी ही दुर्घटना घडली व मशीन तेव्हापासून बंद पडली होती. आता रुग्णांची गरज व अडचण लक्षात घेता प्रशासनाने आत ही मशीन दुरुस्त करण्याचा निर्णय घेतला आहे.
ही एमआरआय मशीन फिलिप्स कंपनीची असल्याने याच कंपनीकडून ती दुरुस्त करण्यात येणार आहे. या दुरुस्ती अंतर्गत स्पेअर पार्ट्सचा खर्च – 56,67,4242 रुपये, सर्व्हिस अॅक्टिव्हिटी खर्च – 23,60,000 रुपये, हेलिअम भरण्याचा खर्च – 13,79,184 रुपये असा एकूण खर्च 94, 06,608 रुपये इतका असणार आहे. तसेच वार्षिक परिरक्षणाचा खर्च 59, 27, 128 रुपये इतका येणार आहे. यामुळे सर्व प्रकारचा एकूण खर्च हा 1,53,33,736 रुपये इतका येणार आहे.
28 जानेवारी 2018 रोजी नायर रुग्णालयात एका रुग्णाचा नातेवाईक राजेश मारू या व्यक्तीचा रुग्णासोबत असलेल्या ऑक्सिजन गॅस सिलिंडरसह एमआरआय मशीनमध्ये ओढले गेल्याने त्यातच अडकून दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेचे तीव्र पडसाद पालिका सभागृहात उमटले होते. पालिकेने ज्या ठिकाणी एमआरआय मशीन ठेवली होती तेथे प्रशिक्षित कर्मचारी, सुरक्षा रक्षक न ठेवल्याने व आवश्यक दक्षता न घेतल्याने ही दुर्घटना घडल्याचा आरोप सर्वपक्षीय गटनेते, नगरसेवक व मृत राजेश मारू यांच्या नातेवाइकांनी केला होता. या दुर्घटनेमुळे या मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांवर मोठे संकट ओढवले होते. त्यावेळी, सभागृहात झालेल्या चर्चेप्रसंगी मृत व्यक्तीच्या वारसाला पालिकेच्या सेवेत कायस्वरूपी नोकरी देण्यात यावी व त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी तसेच नायर रुग्णालयातील या दुर्घटनेला जबाबदार डीन व संबंधित डॉक्टर यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते रवी राजा, राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव, सेनेचे नगरसेवक दिलीप लांडे आदी सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली होती.